पान:विवेकानंद.pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५६
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


नाना रंगांचे अनेक ढग येऊन थोडा वेळ राहतात आणि जातात; पण त्यांचा कांहीं परिणाम आकाशावर होतो काय ? आकाशाला त्यांचा लेप कधी लागतो काय ? अनेक रंगांचे ढग आले आणि गेले, तरी त्यामुळे आकाशाच्या नीलप्रभेत कांहीं फरक पडत नाहीं; ते सदैव एकरंगीच असते. ढगाच्या रंगांत वारंवार बदल झाला, तरी आकाशाचा रंग पालटत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही सर्वकाळ पूर्णच आहां; तो तुमचा हक्कच आहे; तो तुमच्याकडून काढून घेण्याला कोणी समर्थ नाहीं. “मी अपूर्ण आहे, मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी पापी आहे, मी मनःस्वरूप आहे, मी विचार करतों' इत्यादि भावना शुद्ध मृगजलासारख्या आहेत. तुम्हांला शरीर नाहीं, मन नाहीं आणि तुम्ही केव्हां विचारही करीत नाहींत. अपूर्ण अशा अवस्थेत तुम्ही केव्हांच नव्हता. या सर्व विश्वाचे चालक तुम्हीच. तुम्ही सदैव कल्याणरूप आहां. जें कांहीं आज जन्माला आले आहे, आणि जें पुढे जन्माला येणार असेल, त्या सर्वांचे शास्ते तुम्हीच आहां. विश्वांत दिसणारे सूर्य, चंद्र, तारे, ग्रह आणि उपग्रह, तसेच अनेक लोक व त्यांतील झाडेझुडपे इत्यादिकांवर तुमचीच सत्ता आहे. तुम्ही आहां म्हणून सूर्याला त्याचा प्रकाश प्राप्त झाला आहे. तुमच्या तेजाच्या अंशाने तारे चमकत आहेत. तुमच्यापासूनच पृथ्वीला तिचे सौंदर्य प्राप्त झालें आहे. तुमच्या प्रेमसागरांतील तुषार या विश्वातील वस्तूंना प्राप्त होतात; आणि त्यामुळेच ती प्रेमाने एकमेकांना कवटाळू पाहतात. गुरुत्वाकर्षणाच्या कायद्याचा हाच अर्थ आहे. सर्वत्र तुमचेच अधिष्ठान आहे-किंबहुना सर्व तुम्हीच आहां. अशा स्थितींत प्रिय कोण आणि द्वेष्य तरी कोण ? घ्यावे कोणाला आणि टाकावे तरी कोणाला ? आपण स्वतःच सर्वकांहीं आहों. या ज्ञानाचा प्रत्यय आला म्हणजे सध्याच्या स्वप्नांतून तुम्ही जागे व्हाल.
 हिंदुस्थानांतील एका निर्जन अरण्यांत मी एके वेळी प्रवास करीत होतों. त्या अरण्यांत सुमारे एक महिनाभर मी प्रवास केला. तेथे कित्येक वेळां अत्यंत सुंदर देखावे मला दिसत असत. एखाद्या तळ्यांत नवपल्लवांनी सुशभित झालेली वृक्षराजी मला दिसे. स्फटिकासारख्या पाण्यांत नवीन पालवलेल्या वृक्षलतांचे प्रतिबिंब पडलें, ह्मणजे, त्या संयोगाचा देखावा खरोखर मनोहर असतो. एके दिवशीं भर दोनप्रहरी बराच वेळ चालल्यामुळे मला फार तहान लागली होती. थोड्याशा अंतरावर अशाच प्रकारचे एक तळे