पान:विवेकानंद.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५४
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


आणि तेच ‘मी,' 'तू,' 'तो' इत्यादि अनेक रूपांनी दिसत आहे. याकरिता *मी,' *तू,' 'तो' इत्यादि प्रकारांनी दिसणारा भेद खरा-चिररूप-नसून, केवळ भ्रमामुळे तो भासत आहे. ईश्वराच्या ठिकाणी खरा भेद उत्पन्न झाला नसून, तो उत्पन्न झाल्यासारखा भास मात्र होतो. आता हा भास तरी कसा उत्पन्न झाला, याचा विचार करणे अवश्य आहे. हा भास, देश-काल-निमित्त या उपाधीमुळे उत्पन्न झाला आहे. या उपाधीच्याद्वारा आपण ईश्वराकडे अवलोकन करीत असल्यामुळे, तो अनेकशः भिन्न झाल्यासारखा दिसतो. देशकाल-निमित्त ही उपाधि जडरूप असल्यामुळे, तद्द्वारा अवलोकिलेलें परमात्मरूपही जडविश्वाच्या रूपाने प्रतीत होते. या उपाधीचा, केवळ जड असलेला अंश टाकून, त्याहून उच्च अंशांतून त्याच परमात्मरूपाकडे आपण पाहिले, तर तेही पशू, पक्षी इत्यादि चैतन्ययुक्त रूपांनीं गोचर होते. त्याहूनही अधिक उच्चतर अंशांतून तेच रूप, मनुष्य या रूपाने दिसते. हीच उपाधि त्याहूनही अधिक शुद्ध स्वरूपाची केली, तर तेच रूप देव या रूपाने दिसेल. याप्रमाणे उपाधिभेदामुळे अनेक रूपे प्रतीत होत असली, तरी वस्तुतः सर्वत्र एकच रूप भरले आहे. एकच परमात्मा-ब्रह्म-सर्वत्र आहे; आणि तेच ब्रह्म, आपण आहों. मीही वस्तुतः ब्रह्म आहे आणि आपण सर्वही ब्रह्मच आहां. आपण त्याचे भाग नसून संपूर्ण ब्रह्मच आहों. या विश्वरूप देखाव्याच्या मागें तोच अनंत आणि सर्वज्ञ आहे. तोच हें विश्व नटला आहे. तोच 'मी' आणि तोच 'तू' आहे. हा सर्वज्ञ स्वतःला कसा जाणतो? जाणणारा स्वतःला जाणू शकत नाहीं. आपण सर्व वस्तू पाहू शकतों, पण स्वतःला मात्र पाहू शकत नाहीं. त्याचप्रमाणे परमात्मा, सर्वज्ञ, सर्वांचा अधिष्ठाता, सत्यरूप आणि या विश्वांतील देखाव्यांचे मूळकारण असूनही स्वतःला जाणू शकत नाही. त्याला स्वत:ला जाणावयाचे असेल, तर ते प्रतिबिंबरूपाने मात्र जाणता येईल. आपणांस आपले तोंड पहावयाची इच्छा झाली तर आपण आरसा मध्यस्थ घेतो. त्यांत प्रतिबिंबित झालेले आपले तोंड आपण पाहू शकतो. त्याचप्रमाणे सर्वज्ञालाही स्वतःचे रूप पाहावयाचे असले, तर एखाद्या मध्यस्थाची मदत घ्यावी लागते. त्या मध्यस्थांत प्रतिबिंबित झालेले स्वतःचे रूप सर्वज्ञ पाहू शकेल. मध्यस्थाच्या मदतीशिवाय आत्मरूपाचे ज्ञान त्याला होणार नाही. हे सर्व विश्व त्या अनंत सर्वज्ञाच्या आरशासारखे आहे. स्वतःचे रूप पाहण्याची इच्छा