पान:विवेकानंद.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन–प्रकरण ४ थे.

१५३


उपादानकारणही आहे याबद्दल त्या सर्वांची एकवाक्यता आहे. या विश्वांत जें जें कांहीं प्रतीतीला येते ते सर्व तोच आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक जीवात्मा हा ईश्वराचाच अंशभूत आहे असे वेदान्तमत आहे. जीवात्मा हा त्या अनंत अग्नीचा एक स्फुलिंग आहे. * तदेतत्सत्यं यथा सुदीप्तात्पावकाद्विस्फुलिंगाः सहस्रशः प्रभवंते सरूपाः ॥ तथाक्षराद्विविधाः सौम्यभावाः प्रजायंते तत्र तत्र चैवापियति ॥” ( मुंडकोपनिषत् २. १). ज्याप्रमाणे मोठ्या पेटलेल्या अग्नींतून लक्षावधि ठिणग्या उडतात, त्याचप्रमाणे या प्राचीन एकरूपांतून हे आत्मे जन्म पावले आहेत; हे सर्व वेदान्त्यांचे मत आहे. या मताबद्दल निरनिराळ्या आचायत एकवाक्यता आहे आणि येथपर्यंत केलेले विवेचन आपणा सर्वोस पटण्याजोगेंही आहे; तथापि एवढ्याने पूर्ण समाधान होते असे मात्र नाहीं. अनंतरूपाचा अंशभूत' या शब्दांचा अर्थ काय ? जे अनंत आहे ते अविभाज्य असते असा सिद्धांत आहे. अनंताचे-केवलरूपाचे-भाग पाडतां येणे जर शक्य नाही, तर जीवात्मे त्याचेच अंशभूत आहेत असे कसे म्हणता येईल ? या शंकेचे समाधान अद्वैतमताने केले आहे. जीवात्मे हे ईश्वराचे अंशभूत आहेत, हे खरे; पण त्याचा अर्थ ईश्वराचे इतके भाग पडले असा नाहीं. प्रत्येक जीवात्मा हा ईश्वराचा लहानसा भाग आहे असे नसून, तो पूर्ण ईश्वरच आहे. तो पूर्णब्रह्मरूप आहे. आतां यावर अशी एक शंका उद्भवते की, जितके जीवात्मे तितके ईश्वर-ब्रह्मे आहेत की काय ? जीवात्मे अनंत आहेत; आणि प्रत्येक जीवात्मा पूर्ण ईश्वर आहे असे म्हटले, तर ईश्वरही अनंत आहेत असेच झाले. या शंकेचे समाधान असे आहे की, सूर्य उगवला म्हणजे पाण्याच्या लक्षावधि बिंदूत लक्षावधि सूर्यप्रतिबिंबे दिसतात. प्रत्येक बिंदूत सूर्याची एक लहानशी पण हुबेहूब प्रतिमा असते. त्याचप्रमाणे प्रत्येक जीवात्मा ईश्वराचे प्रतिबिंब आहे. जीवात्मा हा खरा ईश्वर नसून ईश्वराचे प्रतिबिंब मात्र आहे. या विश्वाचा प्रकाशक जो ईश्वर, त्याची हीं सारी प्रतिबिंबे आहेत. त्याचीं अनंत प्रतिबिंबे पडून मनुष्ये आणि पशुपक्ष्यादि सृष्टि निर्माण झाली आहे. सर्व दृश्य विश्व में प्रतिबिंबरूप आहे. प्रकृतीवर ईश्वराचे प्रतिबिंब पडले, म्हणजे तिची अनेक रूपें चैतन्ययुक्त दिसू लागतात. हीं अनेक रूपें प्रकृतीची आहेत. याकरिता त्यांचे अस्तित्व खरे नसून ते मृगजलासारखे आहे. हीं सर्व रूपें भ्रामक आहेत. या विश्वांत जे कांहीं आहे ते अनंत-एकरूपच आहे,