पान:विवेकानंद.pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन–प्रकरण ४ थे.

१५१

प्रकरण ४ थे.


मुक्त आत्मा.


 पूर्वी केलेल्या सांख्यमताच्या विवरणावरून, प्रकृति आणि पुरुष-आत्माअशी दोन अनंत तत्त्वे आहेत असे श्रीकपिलांचे मत आहे, हे आपल्या लक्ष्यांत आलेच असेल. हे मत द्वैतवादी आहे. आत्मे अनेक असून ते मिश्ररूप नसल्यामुळे त्यांना अंत नाहीं; आणि तसेच प्रकृति ही वारंवार परिणाम पावत असून तद्द्वारा हीं अनेक रूपे ती धारण करीत असली, तरी ती जडस्वभाव आहे असे सांख्यांचे म्हणणे आहे. त्याच्या मताप्रमाणे प्रकृतीचे समवायीरूप अमिश्र आहे, आणि ती अनेक मिश्ररूप धारण करते त्याचा हेतुः आत्म्याची मुक्ति हाच होय. * पुरुषमोक्षनिमित्तं प्रवृत्तिः प्रधानस्य ।” ( सांख्यकारिका ५७ ). आपण स्वतः प्रकृतिरूप नसून केवलरूप-अमिश्ररूप-आहों अशी खूण पुरुषाला पटणे हीच त्याची मुक्ति. पुरुषाने या अनेक रूपांचा अभ्यास करून, आपण त्या रूपांहून निराळे आहों अशी खूण पटवून घ्यावी, याचसाठी प्रकृतीने हा सारा खटाटोप केला आहे. प्रत्येक पुरुष सर्वव्यापी आहे असेही सांख्यांस कबूल करावे लागते, हेही आपण पाहिलेंच आहे. पुरुष हा कोणत्याही पदार्थांच्या मिश्रणाचे कार्य नसून, तो केवलरूप असल्यामुळे त्याला मर्यादा घालणारा कोणीही नाही. कारण कोणत्याही पदार्थाला मर्यादा पडते ती देश-काल-निमित्त या उपाधीमुळे पडत असते. पुरुष या साच्या उपाधींच्या पलीकडचा आहे. याकरिता त्याला मर्यादा उत्पन्न होणे केवळ अशक्यच आहे. उपाधि उत्पन्न होण्याकरितां स्थलमर्यादा अवश्य असली पाहिजे. स्थलमर्यादा म्हणजे विशिष्ट आकार अथवा देह. देह अथवा आकार में प्रकृतीचे कार्य आहे. जर पुरुषाला आकार असेल तर तोही प्रकृतीचेच कार्य होईल. याकरितां पुरुषाला आकार असणे शक्य नाही. निराकार वस्तु अमुक एका स्थळी आहे असा तिजबद्दल निर्देश करता येणे शक्य नाहीं. ती सर्वत्र सर्वव्यापी-असली पाहिजे. सांख्यमताचा एकंदर मथितार्थ इतकाच आहे. या पलीकडे सांख्यशास्त्र जाऊ शकत नाहीं.
 सांख्यशास्त्राविरुद्ध अद्वैतवाद्यांचा जो पहिला मोठा आक्षेप आहे तो हा, कीं, सांख्यशास्त्र अपुरे आहे. प्रकृति केवलरूप आहे आणि पुरुषही केवलरूप