पान:विवेकानंद.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४८
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय

प्रतीत होणार नाहीत. कारण, हे भेदही मनाचेच कार्य आहे. ही दोन निराळीं आहेत हा भेद मनानेच निर्माण केला आहे, हे अगदी उघड आहे. एकंदर वस्तुजातांत असा भेद निर्माण करून एकाला बाह्यविश्व आणि दुस-याला अंतःसृष्टि अशीं नांवेंही मनानेच दिली आहेत. 'क्ष' आणि 'ब' हीं दोन्ही स्वरूपें वस्तुतः अज्ञात व अज्ञेय आहेत. ती अमुक एका स्वरूपाची आहेत असे स्वतंत्रपणे आपल्या मनाच्या साहाय्यावांचून-सांगतां येणे शक्यच नाही. याकरिता ती एकरूपच आहेत. ज्या वस्तुजातावर कोणत्याही गुणाचा अथवा उपाधीचा आरोप स्वतंत्रपणे करता येत नाही, ते सर्व वस्तुजात एकरूपच असले पाहिजे. केवलस्वरूपाची वस्तु एकच असू शकेल, त्या दोन असणे शक्यच नाहीं, हे आपण सिद्ध केलेच आहे. याकरितां गुणोपाधिकल्पना•शिल्लक आहे तोपर्यंतच भेद दिसेल, आणि ती कल्पना नष्ट होण्याबरोबर जे कांहीं उरेल तें केवलरूप-एकरूप–मात्र उरेल. 'क्ष' आणि 'ब' ही दोन्ही रूपें वस्तुतः निर्गुण आहेत. त्यांच्या ठिकाणीं गुणांचा आरोप मनामुळे केला जातो. याकरितां या दोन्ही निर्गुण वस्तू खरोखर एकरूपच असल्या पाहिजेत.
 सर्व विश्व वस्तुतः एकरूपच आहे. विश्वांत पुरुष एकच आहे, आणि अस्तित्व-सत्-एकच आहे. ज्या वेळी हे सत् देश-काल-निमित्त या उपाधीने बद्ध झाल्यासारखे दिसू लागते, त्या वेळी त्याला महत्, अहंकार, तन्मात्रे, महाभूते इत्यादि नांवें प्राप्त होतात. या विश्वांत प्रतीत होणारी सर्व जडरूपे आणि विचार, मन, इत्यादि रूपें ही सर्व त्या एकरूपाचीच आहेत. ते एकच अनेक रूपांनी प्रतीत होत आहे, ते एक देश-काल-निमित्त या उपाधीच्या जाळ्यांत सांपडले की त्याला आकार उत्पन्न होऊ लागतात. या जाळ्याचा उच्छेद झाला तर ते पूर्वी जसे एकरूप होते, तसेच ते पुन्हा होईल. जें एक या विश्वरूपाने प्रतीत होत आहे, त्याला अद्वैतमतानें ब्रह्म असे नांव दिले आहे. ब्रह्मांडाच्या पाठीमागे जे प्रकाशक ब्रह्म असते त्याला ईश्वर आणि पिंडाच्या मागे जे प्रकाशक ब्रह्म त्याला आत्मा असे नांव आहे. येथपर्यंत केलेल्या विवेचनावरून आत्मा आणि ईश्वर यांचे स्वरूप एकच कसे आहे हे आपल्या लक्ष्यांत आले असेल. ईश्वर आणि मनुष्य यांच्या स्वरूपांचे पृथक्करण केले, तर ते दोघेही एकरूपच आहेत असे सिद्ध होते. याकरिता