पान:विवेकानंद.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन–प्रकरण ३ रें.

१४७


अंतःसृष्टि निर्माण होते, हे आपण पूर्वी सिद्ध केलेच आहे. 'क्ष' आणि 'ब' या दोन अज्ञात आणि अज्ञेय वस्तू आहेत, हेही आतां आपणांस माहीत आहेच. मन या शब्दाचा अर्थ तरी काय ? मन ही संज्ञा आपण ज्या वस्तूला लावतों तिची शास्त्रीय व्याख्या काय ? मन ह्मणजे काल-देश-निमित्त. मन ही वस्तु तयार होण्याला या तीन मूलवस्तू लागतात. कोणत्याही गोष्टीबद्दल तुह्मी विचार करू लागलां, की त्याबरोबर कालकल्पना तुमच्या ठिकाणीं अवमश्येव उद्भवते. कालाच्या साहाय्यावांचून त्या वस्तूचा विचार सुरू होणेच शक्य नाही. त्याचप्रमाणे त्या वस्तूचे स्थल आणि निमित्त हीं प्रथम मनांत आल्यावांचून, त्या वस्तूबद्दल कोणत्याही प्रकारची विचारपरंपरा सुरू होणे शक्य नाहीं. अमुक वस्तु' इतका विचार चित्तांत आल्याबरोबर ‘ती अमुक कालीं आणि स्थली असलेली व अमुक निमित्तामुळे उत्पन्न झालेली इतकी विचारपरंपरा चित्तांत प्रथमच तयार होते. या विचारपरंपरेचा अभाव झाला तर त्या वस्तूबद्दलच्या कल्पेनचाही अभाव होईल. वस्तु 'क्ष' स्वरूपाची असो अगर ‘ब' स्वरूपाची असो. तिजबद्दल विचारपरंपरा सुरू होण्यास, ती या देश-काल-निमित्ताच्या उपाधींत प्रथम बांधली गेली पाहिजे. या मर्यादात्रयीने ती निगडित झाल्यानंतरच पुढील विचारपरंपरेला सुरुवात होणे शक्य आहे. या तिहींचा अभाव झाला तर त्या अभावाबरोबर मनाचाही अभाव होईल. कोणत्याही उपाधीने युक्त नाही अशा वस्तूबद्दल मन कधीही चिंतन करू शकणार नाही. अशा एखाद्या वस्तूबद्दल विचार करून पहा, ह्मणजे या उपाधित्रयीच्या साहाय्यावांचून चिंतनक्रिया सुरूच होत नाही असे तुह्मांस आढळून येईल. आतां खुद्द या उपाधित्रयीबद्दल विचार केला, तर तिलाही स्वतंत्र अस्तित्व नाहीं-तिचे अस्तित्व वस्तूवर अवलंबून आहे-असे आढळून येईल. जर विश्व अदृश्य झाले, तर देश-कालनिमित्त ही उपाधित्रयी तरी कोठे राहील? अशारीतीने वस्तुकल्पना आणि उपाधिकल्पना या संयुक्त कल्पना आहेत. त्या परस्परावलंबी कल्पना आहेत. त्यांपैकी एक नष्ट झाली तर दुसरीही आपोआप तिच्यामागे जाईल. या दोन्ही कल्पना नष्ट झाल्यावर मनही आपोआपच निष्क्रिय होणार. तें पूर्ण निष्क्रिय झालें-त्याचे मनपण नष्ट झाले–ह्मणजे शेवटी काय उरेल ? जें कांहीं उरेल तें एकरूपच उरेल. त्या ठिकाणी 'क्ष' आणि 'ब' हे भेदही