पान:विवेकानंद.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन–प्रकरण ३ रें.

१४५


ओघालाच येते. प्रकृतीच्या महदादि रूपांपलीकडे असलेल्या या ब्रह्मांडपुरुषाला ईश्वर असे नांव वेदान्ताने दिले आहे. ज्याप्रमाणे पिंडपुरुष -आत्मा-हा पिंडाचा शास्ता आणि प्रकाशक आहे, त्याचप्रमाणे ईश्वर हा ब्रह्मांडाचा शास्ता आणि प्रकाशक आहे.
 आतां तिस-या मतभेदाचा विचार करू. हा मतभेद फार तीव्र आणि नाजूक आहे. आत्मे अनेक-अनंत आहेत असे श्रीकपिलांचे मत आहे. आत्मा एकच असणे शक्य आहे असे वेदान्ताचे म्हणणे आहे. सांख्यांचीं बाकीची मते मान्य करून व त्यांच्याच विचारसरणीने चालून सांख्यांचे हें मत आम्हांला जमीनदोस्त कसे करता येते हें आतां दाखवितो. सांख्यांच्या मताप्रमाणे प्रत्येक पुरुष-आत्मा-सर्वव्यापी असला पाहिजे असे सिद्ध होते. कारण, पुरुष हा केवलरूप आहे; मिश्रणरूप नाहीं. तो अमुक एका वस्तूचा बनला आहे असे नाहीं. तो ज्या अर्थी मिश्रणरूप नाही, त्या अर्थी तो सर्वव्यापी असला पाहिजे. वस्तु मर्यादित असली म्हणजे तिला मर्यादा घालणारी दुसरीही एक वस्तु असली पाहिजे हे उघडच आहे. येथे हें टेबल आहे आणि ते मर्यादित आहे. भोवतालच्या परिस्थितीने ते मर्यादित झाले आहे. अमुक वस्तु मर्यादित आहे असे म्हटले की त्याबरोबरच तिला मर्यादा घालणारा वस्तुसंघ असलाच पाहिजे, ही कल्पनाही आपोआपच उत्पन्न होते. या दोन कल्पना अविभाज्य आहेत. जेथे एक आली तेथे दुसरीही आपोआपच येते. एखाद्या लहानशा-मर्यादित स्थलाचा विचार आपल्या मनांत आला, की त्याबरोबरच त्या बाहेरील अमर्याद स्थलाची कल्पनाही आपल्या मनांत आपोआप येते. अमर्याद स्थलांतच कांहीं वस्तुसंघ निर्माण होऊन त्यांतून मर्यादित स्थलाची उत्पत्ति होत असल्यामुळे, या दोन्ही कल्पना एकसमयावच्छेदेंकरून आपल्या मनांत उभ्या राहतात. मर्यादित वस्तु ही अमर्याद वस्तूचा भाग असल्यामुळे, त्यांची संलग्नावस्थाच आपल्या चित्तांत उत्पन्न होते. याकरितां मर्यादित वस्तूचा विचार करावयाचा म्हटले, की त्याबरोबर अमर्याद वस्तूचीही कल्पना चित्तांत असली पाहिजे. एखाद्या विशिष्ट कालाचा-कालभागाचा विचार आपल्या मनांत आल्याबरोबर अनंतकालापैकी हा 'अमुक भाग' असे आपल्या मनांत येते. हा कालभाग म्हणजे मर्यादित काल असून अनंत-अमर्याद्-काल त्यापलीकडे आहे. अशाच रीतीने कोणत्याही मर्यादित
 स्वा. वि. खं. ३-१०.