पान:विवेकानंद.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४४
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


आतांपर्यंत केलेल्या विवेचनावरून, श्रीकपिलांच्या मतांत आणि वेदान्त मतांत फरक कोठे आहे, हे आपल्या लक्ष्यांत थोडेबहुत आले असेल. पुरुष अत्यंत निर्गुण, वर्णरहित आणि अक्रिय असा आहे असे श्रीकपिलांचे मत आहे. श्रीकपिलांचे हे मत वेदान्ताला मान्य नाहीं. आत्मा-पुरुष-सच्चिदानंदरूप आहे असे वेदान्ताचे म्हणणे आहे. मानवी मनाने जितकें कांहीं जाणतां येण्याची शक्यता आहे, त्याहून आत्मा अनंतपटीने ज्ञानवान् आहे. मानवी प्रेमाची जी कांहीं कल्पना आपणांस करता येईल, त्याहून अनंतपटीने आनंद, आत्म्याच्या ठिकाणी आहे. आत्मा अमर आहे. जन्म व मृत्यु यांचा नुसता विचारही आत्म्याच्या ठिकाणीं संभवत नाहीं; कारण, तो नव्हता असा काळच केव्हां नाहीं. तो सर्वकाळ होता आणि पुढेही सर्वकाळ राहील.
 श्रीकपिलांचे दुसरेही एक मत वेदान्ताला मान्य नाही. ते मत म्हणजे श्रीकपिलांचे ईश्वराबद्दलचे मत होय. ज्याप्रमाणे पिंडांत व्यक्त झालेल्या प्रकृति रूपांना प्रकाशित करण्यास पिंडस्थ आत्म्याची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे ब्रह्मांडांत व्यक्त झालेल्या प्रकृतीचा प्रकाशक असाही आत्मा असला पाहिजे. पिंडांतील बुद्धयादि वस्तू ज्याप्रमाणे आत्म्याच्या प्रकाशानुरोधानें वर्तत असतात, त्याचप्रमाणे ब्रह्मांडांतील महदादि तत्त्वे ज्याच्या प्रकाशाने चालतात असा कोणी तरी असला पाहिजे. ज्याप्रमाणे पिंडांतील वस्तुपरंपरेच्या शेवटी आत्मा हा असलाच पाहिजे, त्याचप्रमाणे ब्रह्मांडांतील वस्तुपरंपरेचा शेवट आत्म्यांतच झाला पाहिजे. तसे न होईल तर ही परंपरा अपूर्णावस्थेत राहिली असे होईल. परमेश्वराला अस्तित्व नाही असे मानावयाचे ह्मटले, तर मनुष्यांतही आत्मा नाहीं असें ह्मणणे भाग पडेल ! पिंड आणि ब्रह्मांड यांची रचना तत्त्वदृष्ट्या एकसारखीच आहे, हे आपण नुक्तेच पाहिले आहे. एका शितावरून खंडीभर भाताची परीक्षा करता येते. एका पिंडाचे पृथक्करण करून त्याचे ज्ञान आपण संपादन केले, तर सर्व ब्रह्मांडाचे ज्ञान आपणांस प्राप्त झाल्यासारखेच आहे. कारण, पिंड आणि ब्रह्मांड यांच्या रचनत तत्त्वदृष्टया कांहीं सुद्धां भेद नाहीं. या दोन्ही इमारती एकाच नमुन्यावर बांधल्या गेल्या आहेत. याकरितां, प्रकृतीच्या पलीकडच्या अशा आत्म्याचे अस्तित्व पिंडांत आहे असे मानावयाचे असेल तर ब्रह्मांडांत व्यक्त झालेल्या प्रकृतीपलीकडेही आत्म्याचे अस्तित्व आहे हे ह्मणणे तर्कशास्त्राला अनुसरून