पान:विवेकानंद.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन–प्रकरण ३ रे.

१४३


होत असतो. यामुळे मध्यस्थाचे जे कांहीं रूप असेल, त्याप्रमाणेच त्या प्रकाशाचेही रूप दिसेल हे उघड आहे. माझ्यांतील पुरुषरूपांत आणि एखाद्या पशूतील पुरुषरूपांत मुळचा असा कांहींच भेद नाहीं. आम्हा दोघांतील पुरुष, एकाच स्वरूपाचे आहेत. असे असतांही त्याच्या आणि माझ्या बुद्धींत जो भेद दिसतो, त्याचे कारण, त्याचा मेंदु कमी प्रतीचा मध्यस्थ आहे हेंच होय. यामुळे पशूच्या बुद्धीला उपजतबुद्धीचे म्हणजे कमी प्रतीच्या जडबुद्धीचे स्वरूप प्राप्त होते. दोघांतील मूळ ज्ञानरूप एकच असतां, एकाचा मेंदु अधिक जड आणि दुसन्याचा अधिक तरल असल्यामुळे दोघांच्या बुद्धीत मात्र भेद दिसतो. मनुष्याचा मेंदु अधिक शुद्ध पदार्थांचा बनलेला आहे; यामुळे तद्द्वारा प्रतीतीस येणारे ज्ञान अधिक शुद्ध स्वरूपाचे असते. मेंदूचे स्वरूप जसजसे अधिक शुद्ध होत जाते, तसतसे तद्वारा प्रतीतीस येणारे ज्ञानरूपही अधिक शुद्ध दिसू लागते. अत्यंत शुद्ध मनुष्याचा मेंदु स्वच्छ आरशासारखा असल्यामुळे, त्यांत पडणारे ज्ञानरूपही विशुद्ध असते. याचप्रमाणे आपल्या अस्तित्वाचीही गोष्ट आहे. आपले सध्याचे-कांहीं काळ राहणारे-अस्तित्व में मूळ अनंत अस्तित्वाचे केवळ प्रतिबिंब आहे. अनंत-केवलरूप-अस्तित्व हा पुरुषाचा-आत्म्याचा स्वभाव आहे. याचप्रमाणे आनंदाविषयीही समजावे. आपण ज्याला प्रेम-प्रीति–असे म्हणतो, ते आत्म्याच्या अनंत आनंदरूपाचे प्रतिबिंब आहे. परोक्षवस्तु ज्या मध्यस्थाच्याद्वारे प्रत्यक्ष होऊ लागते त्या मध्यस्थाचें रूप ती धारण करते असे भासते; परंतु त्यामुळे मूळ परोक्षवस्तूचे स्वरूप लवमात्रही बदलत नाहीं. परोक्ष आत्मा प्रत्यक्ष स्वरूपाला येऊ लागला, म्हणजे मध्यस्थाचे मर्यादित रूप त्यालाही लागू होते; पण त्यामुळे आत्म्याच्या मूल अनंत-केवल-स्वरूपांत कांहीं फरक पडतो असे मात्र नाहीं. आत्म्याच्या अनंत-अमर्याद-रूपाला मर्यादा घालण्याला कोणीही समर्थ नाहीं; पण मनुध्यांत व्यक्त झालेले त्याचे रूप मर्यादित असते. एखाद्यावर प्रेम करावे असे मला आज वाटत असते आणि उद्यां त्याचाच मी द्वेष करतो. माझ्या प्रेमाला मर्यादा नाही असे मला आज वाटत असते आणि उद्यांच ते प्रेम कमी होते. माझ्यांत व्यक्त झालेल्या प्रेमाच्या स्वरूपाला अनेक प्रकारच्या मर्यादा उपस्थित झाल्यामुळे, त्याचे स्वरूप आज एक आणि उद्यां भलतेच दिसावे यांत आश्चर्य ते काय ?