पान:विवेकानंद.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३८
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय

'अमुक, तो ‘फळा' असे मी म्हणतों. एखाद्या शांत तळ्यांत आपण धोंडा फेकला व तो खाली जाऊ लागला, म्हणजे पाण्याचे बुडबुडे खालून वर येऊ लागतात; ही तळ्यांतील पाण्याची प्रतिक्रिया होय. दगडाने जी ‘क्रिया' पाण्यावर केली, तिला पाण्याने प्रतिक्रियेच्या रूपाने जणुंकाय उत्तर दिलें ! आपलें चित्त हें या तळ्यासारखे आहे. तळ्यांतील पाण्याने केलेली प्रतिक्रिया ज्याप्रमाणे बुडबुड्यांच्या रूपाने दिसते, त्याचप्रमाणे बाह्यसंवेदनेला चित्ताने केलेली प्रतिक्रिया ज्ञानाच्या रूपाने प्रत्ययाला येते. दगड आणि बुडबुडा यांच्या स्वरूपांत कांहींच साम्य नसते. दगड तो दगड आणि बुडबुडा तो बुडबुडा. हा बाहेरील फळा त्या दगडासारखा आहे. त्याचा आघात चित्तावर झाला म्हणजे तेथून बुडबुडे बाहेर पडू लागतात, व ते बुडबुडेच आपणांस दिसतात; आणि त्यांचे जे कांहीं स्वरूप आपणांस दिसते त्याचा आरोप बाह्यवस्तूवर करून ‘हा फळा' असे आपण म्हणतों. मी सध्या तुमच्याकडे पाहत आहे, तुमचे स्वतःचे वास्तविक स्वरूप काय आहे हे मला माहीत नाही, आणि ते माहीत करून घेण्याचे कांहीं साधनही मजपाशीं नाहीं. तुमचे खरे स्वरूप म्हटलें म्हणजे बीजगणितांतील 'क्ष' हेच. तुम्ही माझ्या चित्तावर आघात केला म्हणजे तेथून बुडबुडे बाहेर पडू लागतात, व जेथून या क्रियेचा मूळ उद्भव झाला त्या दिशेकडे धांव घेऊ लागतात. ते अशी धांव घेऊ लागले म्हणजे मीही त्यांच्या मागोमाग जातो, आणि हे अमुक ‘राजश्री' अथवा या अमुक ‘बाई' असे म्हणतों.
 अशा प्रकारे प्राप्त होणा-या ज्ञानांत दोन तत्त्वे असतात. दोन तत्त्वे मिळून हे ज्ञान निर्माण झालेले असते. यांतील एक तत्त्व अंतर्गत व दुसरें बाह्य असते. अशा रीतीने ही दोन तत्त्वे व आपलें चित्त यांच्या संयोगानें बाह्यविश्वांतील अनेक वस्तू आपण निर्माण केल्या आहेत. सर्व वस्तूंचे ज्ञान हैं। आपल्या चित्ताच्या प्रतिक्रियेपासूनच निर्माण झाले आहे. देवमाशाच्या शेपटीवर तडाका दिला तर त्याला त्याचे ज्ञान होऊन तज्जन्य दुःखाची उत्पत्ति होण्यास मध्यंतरी किती काळ जातो याचे निरीक्षण कित्येकांनी केले आहे. शेपटीवर तडाका दिल्याबरोबर तेथे वस्तुतः दुःखाची उत्पत्ति व्हावी, पण तसे होत नाहीं; कारण, बाह्यसंवेदना चित्तापर्यंत जाऊन, तेथून दुःखरूपाने त्याची प्रतिक्रिया परत येईपर्यंत मध्यंतरीं कांहीं काळ निघून जातो. हा काळ