पान:विवेकानंद.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन–प्रकरण ३ रें.

१३७


आणखी एका निराळ्या परमेश्वराची कल्पना का करावी, असा सांख्यांचा प्रश्न आहे.
 सांख्यमताशी आमचा जो मतभेद आहे, त्यांत तीन मुद्दे आहेत. सांख्यांचे मत असे आहे की, पुरुष हा अगदीं निर्गुण आहे, आणि बुद्धयादि रूपे केवळ प्रकृतीची कार्ये आहेत. सांख्यदर्शनाचे हे ह्मणणे वेदान्ताला मान्य नाहीं. दुसरा मुद्दा असा आहे की, परमेश्वराला अस्तित्व नाहीं असें जें सांख्यांचे ह्मणणे, तेही वेदान्ताला मान्य नाहीं. परमेश्वराचे अस्तित्व मान्य केल्यावांचून अनेक प्रश्नांचा समाधानकारक निकाल लागत नाही असे वेदान्ताचे मत आहे. तिसरा मुद्दा, अनेक पुरुषांच्या अस्तित्वाबद्दलचा आहे. सांख्यमताप्रमाणे या विश्वांत अनेक पुरुष आहेत; वेन्दाताला हेही मत मान्य नाहीं. सर्वव्यापी असा आत्मा एकच असून तो अनेकत्वाने भासतो, असे वेदान्त ह्मणतो. आतां, या तिन्ही मुद्यांचा विचार आपण क्रमशः करूं.
 इच्छा, विवेचकबुद्धि इत्यादि रूपें केवळ प्रकृत्यात्मक असून, पुरुषाशी त्यांचा यत्किंचितही संबंध नाहीं असें जें सांख्यांचे म्हणणे आहे, त्याचा प्रथम विचार करू. पुरुषाचे-आत्म्याचे स्वरूप, सच्चिदानंद हे आहे असे वेदान्ताचे म्हणणे आहे; तथापि बुद्धि ही मिश्रणरूप आहे हे सांख्यमत, वेदान्ताला अमान्य नाहीं. विश्वांतील अनेक वस्तूंचे ज्ञान करून घेण्याच्या आपल्या मार्गाचे शास्त्रीय स्वरूप कसे आहे, याचे विवेचन पूर्वी अनेकवार केलेलेच आहे. बाहेरून येणाच्या संवेदनांची नोंद प्रथम चित्तावर होते; आणि नंतर चित्त जी प्रतिक्रिया करते त्याला आपण ज्ञान असे म्हणतों. या सिद्धांताच्या स्पष्टीकरणासाठी पूर्वीचेच एक उदाहरण पुन्हा घेऊ. माझ्यासमोर मांडलेला हा फळा मला दिसत आहे. या ठिकाणीं वास्तविक कोणती वस्तु आहे याचे ज्ञान मला नाहीं; किंबहुना त्याचे ज्ञान होण्याची शक्यताच नाहीं; ती अमुकचे वस्तु आहे असे जे मी म्हणतों, ते माझे इंद्रियजन्य ज्ञान होय. ते ज्ञान वस्तुगत नसून चित्तगत आहे. बाह्यजग हें केवलवस्तु' आहे असे जर्मन पंडित म्हणतात त्याचे कारण हेच होय. ज्या वस्तूचे स्वरूप अनिश्चित आहे, तिला 'क्ष' असे नांव बीजगणितांत देत असतात. आध्यात्मिकदृष्ट्या जगाचे स्वरूपही 'क्ष' हेच आहे. खुद्द जगाचेच असे निश्चित स्वरूप त्याला नाहीं. प्रथम हे 'क्ष' रूप माझ्या चित्ताकडे धांव घेते, आणि नंतर-चित्ताची प्रतिक्रिया घडली म्हणजे-तें