पान:विवेकानंद.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३६
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय

फुलांच्या सानिध्यामुळे शुभ्र स्फटिकही तांबडा दिसतो, त्याचप्रमाणे प्रकृतींत प्रतिबिंबित झालेला पुरुष सुखी अथवा दुःखी असल्यासारखा दिसला,तरी वस्तुतः तो केवलरूपच आहे. ध्यान हा पुरुषाच्या संनिध जाण्याचा मार्ग आहे. ध्यानस्थ स्थितींतच त्याच्या खच्या स्वरूपाचा प्रत्यय अधिक स्पष्टपणे येतो. समाधिस्थिति, ही अत्युच्च प्रकारची स्थिति आहे असे योगी कां ह्मणतात हे आतां आपल्या लक्ष्यांत आले असेल. मनुष्याच्या सामान्य स्थितीत चापल्य आणि जाड्य असे दोन प्रकार असतात; पण समाधीची स्थिति या दोहोंहून निराळी आहे. ती केवलस्थिति आहे. पुरुष आणि 'मी ' वस्तुतः एकरूपच आहों असा अनुभव, समाधीच्या स्थितीतच प्राप्त होतो.
 प्रकृति ही पुरुषाकरतां व्यक्त झाली आहे असे सांख्यांचे ह्मणणे आहे. "इत्येष प्रकृतिकृतो महदादिविशेषभूतपर्यतः । प्रतिपुरुषविमोक्षा स्वार्थ इव परार्थ आरंभः ॥” अनेक जडपदार्थाचीं मिश्रणे आणि प्रतिमिश्रणे, हीं पुरुषार्थासाठी सुरू राहिली आहेत. मिश्रणे आणि प्रतिमिश्रणे बनण्यांत, त्या पदार्थांचा स्वतःचा असा कांहीं हेतु नाहीं. ही सर्व प्रकारची मिश्रणें-हे सर्व प्रकारचे खेळ, पुरुषाच्या भोगाकरितां आणि मुक्तीकरितां सुरू आहेत.अत्यंत क्षुद्र पदार्थापासून तो अत्युच्च पदार्थांपर्यंत सर्वांचा अनुभव पुरुषाला घडावा, आणि त्या अनुभवाच्या द्वारे पुरुष मुक्त व्हावा, हाच प्रकृतीचा हेतु आहे. हा अनुभव पूर्णपणे आल्यानंतर, आपण प्रकृतीच्या आधीन केव्हांच नसून स्वभावतःच आपण तीहून निराळे आहोत, अशी त्याची खात्री होईल. त्याचप्रमाणे आपण अविनाशी असून गमनागमन करीत नाहीं, स्वर्गादि लोक भौगीत नाही, आणि जन्मही घेत नाही, असेही त्यास आढळून येईल. गमनागमन आणि जन्ममरण हे प्रकृतीचे धर्म असून, ते आपले धर्म नाहींत अशी त्याची खात्री होईल. अशी खात्री एकवार अनुभवाने पटली ह्मणजे पुरुष मुक्त होतो. पुरुष मुक्त व्हावा, याच हेतूने प्रकृति हे सर्व खेळ करीत आहे; आणि स्वतः मुक्त होण्याकरितां पुरुष हे सर्व अनुभव घेत आहे. मुक्ति हेच पुरुषाचे अखेरचे साध्य आहे. सांख्यमताप्रमाणे या विश्वांत अनंत पुरुष आहेत. सांख्यांचे आणखीही एक मत असे आहे की, या विश्वाचा उत्पत्तिकर्ता असा कोणी नाहीं. परमेश्वराचे अस्तित्व सांख्यदर्शनाला मान्य नाहीं. विश्वरचनेचा समाधानकारक उलगडा जर एकट्या प्रकृतीच्या साहाय्याने करता येतो, तर