पान:विवेकानंद.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३४
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[ तृतीय


एकच ज्ञाता आहे. माझ्यासमोर असलेला एक फळा मी पाहिला. त्याकडे पाहण्याबरोबर माझ्या नेत्रांनी त्याचा आकार दृगिंद्रियाकडे पाठविला; आणि दृगिंद्रियाने तो मनाकडे रवाना केला. इतकी क्रिया पूर्ण झाली म्हणजे, मन अहंकाराला जागे करते, आणि त्याचवेळी तो आकार बुद्धीकडे रवाना होतो; पण बुद्धि ही स्वतः जडच आहे. तेथे पुरुषाचे साहाय्य ती घेते. मन, बुद्धि आणि अहंकार, हे सारे पुरुषाचे सेवक आहेत. बाहेरून ज्या कांहीं चिजा गोळा होतील त्या पुरुषापर्यंत आणून पोहोंचवावयाच्या, हे या सेवकांचे काम आहे. त्यानंतर पुरुषाच्या हुकुमाप्रमाणे पुढील तजवीज ते करतात. पुरुषाचा हुकुम घेऊन बुद्धि परत फिरते व तो हुकुम अहंकाराला पोहोंचविते; आणि अहंकार मनोद्वारा बाहेर येऊन, 'मीं फळा पाहिला' असे म्हणतो. वस्तुतः हे सारे सेवकजन असून पुरुष हा भोक्ता आणि द्रष्टा आहे. पुरुष हा सिंहासनस्थ राजासारखा असून तो कैवलरूप-सत्यरूप-आहे. तो ज्या अर्थी मूलरूप आहे, त्या अर्थी तो अमर्याद असला पाहिजे, हे अगदी उघड आहे. तो स्वतःच मूलरूप असल्यामुळे त्याला मर्यादा कोणत्या पदार्थाने घालावी ? यामुळे तो मर्यादित होणे शक्यच नाहीं. पुरुष अनंत असून, त्यांपैकी प्रत्येक अमर्याद आणि सर्वव्यापी आहे; सूक्ष्म आणि स्थूल स्वरूपाच्या पदार्थांच्या संयोगामुळे तो कार्यकारी झाला आहे; तो स्वतः कांहीं करीत नाहीं. जडपदार्थांचा अभाव झाला, तर त्याचे कोणतेही कार्य दिसणार नाहीं. जडपदार्थाशीं संयोग झाला, म्हणजे तो कर्ता आहे असे दिसते. मन, अहंकार, इंद्रिये आणि प्राणशक्ति हीं सर्व मिळून सूक्ष्म शरीर बनते. यालाच ख्रिस्तीतत्त्वज्ञांनीं Spiritual Body असे म्हटले आहे. याच शरिराच्याद्वारे प्राणी सुखदुःखादि भोग भोगतो. त्याच प्रमाणे स्वर्गादि लोकांस जाणारे शरीरही हेच आहे. हेच शरीर पुनःपुनः जन्म घेते; कारण, पुरुषाला जन्म नाहीं आणि मृत्यूही नाहीं हें पूर्वी आपण सिद्ध केलेंच आहे. जाणे आणि येणे म्हणजे, हालचाल करणे अथवा एका स्थलाहन दुस-या स्थली प्रवास करणे असे आहे. जो पदार्थ स्थलांतर करू शकतो, तो सर्वव्यापी असू शकणार नाही. पुरुष सर्वव्यापी आहे हे आपणांस ठाउकच आहे; याकरितां स्थलांतर करणे पुरुषाला शक्य नाही, आणि तो स्थलांतर करीत नाही. त्याअर्थी, त्याला जन्म आणि मृत्यु असणे आणि तसेच स्वर्गादि लोकगमन हींही शक्य नाहींत; ह्मणून, जन्म आणि मृत्यु हे केवळ लिंग