पान:विवेकानंद.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन–प्रकरण ३ रे.

१३३


उत्क्रांति हाच होय. एकांतून दुसरे आणि दुस-यांतून तिसरें, याप्रमाणे सर्व सृष्टातील तत्त्वं उत्क्रांत झाली आहेत, असे श्रीकपिलांचे म्हणणे आहे. * कारणमस्त्यव्यक्तं प्रवर्तते त्रिगुणतः समुदायाच्च । परिणामतः सलिलवत् प्रतिप्रतिगुणाश्रयविशेषात् ॥” कारणच कार्यरूपाने अवतरते-व्यक्त होतेअसा श्रीकपिलांचा आदिसिद्धांत आहे. कारण प्रथम अव्यक्त असते आणि तेच गुणांच्या आश्रयाने कार्यरूप धारण करते. कारण आणि कार्य यांत गुणधर्माचा भेद नाही. त्यांतील भेद म्हटला म्हणजे, एक अव्यक्त आणि दुसरे व्यक्त असते इतकाच. विश्वाचे जे कांहीं स्वरूप आपण पाहतों, तें सारें अशाच रीतीनें पायरीपायरीनें प्रकट झाले आहे. हे सारे विश्व ज्यांतून उत्क्रांत झालें, ते मूळकारण प्रकृति हेच होय. आणि ज्या अर्थी कारण व कार्य यांच्या गुणधर्मात भेद नसतो असा सिद्धांत आहे, त्या अर्थी प्रकृति आणि विश्व यांच्या स्वरूपांतही वास्तविक भेद नसावा हे युक्तच आहे. प्रकृति आणि विश्व यांच्या स्वरूपांत जो कांहीं भेद असतो तो इतकाच की, प्रकृति अमर्याद असते आणि विश्व व्यक्त झाले म्हणजे नामरूपादि उपाधींनी ते मर्यादित होते. प्रकृति-कारणरूप-नामरूपादि उपाधींच्या पलीकडची-निराकार-आहे; तथापि अव्यक्त प्रकृतीपासून तो थेट शेवटच्या व्यक्त पदार्थापर्यंत कोणीही पुरुषस्वरूपी नाही, असे श्रीकपिलांचे म्हणणे आहे. पुरुष हा भोक्ता आणि प्रकाशक असून, प्रकृति ही भोग्य आणि प्रकाश्य आहे. पुरुष आणि प्रकृति यांत कोणतेही साधर्म्य नाही. एखाद्या मातीच्या गोळ्याला जी किंमत आहे, तीच मनाला आणि बुद्धीला व सर्व विश्वालाही आहे. विश्वांतील कोणतीही वस्तु स्वयंप्रकाश नाहीं; पण ज्या अर्थी बुद्धि आणि इच्छा ही सचेतन रूपें विश्वांत आपल्या अनुभवाला येत आहेत, त्या अर्थी या वस्तुतः अचेतन पदार्थांच्या मागे कोणी तरी प्रकाशक असला पाहिजे हे उघड आहे. ज्याला चिरंतन अस्तित्व आहे असा सत्रूप पदार्थ या जडपदार्थांच्या पाठीमागे असून, त्याचा अस्तित्वधर्म या जडपदार्थांच्याद्वारे व्यक्त होत आहे. तोच सत् पदार्थ महत्, अहंकार इत्यादि अनेक रूपांच्याद्वारे दिसत आहे. या सत् वस्तूला पुरुष आणि आत्मा अशी नांवें श्रीकपिलांनी दिली आहेत. श्रीकपिलांच्या मते पुरुष हा मूलरूप-केवलरूप-आहे; तो मिश्रपदार्थ नाहीं; तो जड नाहीं. जड नाहीं असा, या विश्वांत तोच एक आहे. विश्वांतील बाकीच्या सर्व वस्तू जड आहेत. पुरुष हा