पान:विवेकानंद.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३२
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय

विश्वांत चालू आहेत, त्यांपैकीच श्वासोच्छास ही एक क्रिया आहे. त्याचप्रमाणे दुस-याही कित्येक प्राणक्रिया आपल्या या देहांत प्रत्येकक्षणी चालू आहेत. संदेश पोहचविण्याची व आपल्या सर्व शरिराची यथायोग्य हालचाल सुरू ठेवण्याची क्रिया ज्ञानतंतू करीत असतात. त्या ज्ञानतंतूंच्या अंगीं हैं सामथ्य प्राणशक्तीमुळेच आलेले आहे. श्वासोच्छ्रास ही प्राणशक्तीच्या अनेक क्रियांपैकी एक उघड दिसून येणारी क्रिया आहे. श्वासोच्छ्रास हे हवेमुळे होत नसून प्राणामुळे होतात. ते हवेमुळे होत असते, तर मृत मनुष्यांतही श्वासोच्छास चालू राहिला असता. प्राणाचा आघात हवेवर होऊन श्वासोच्छवास सुरू होतात. या क्रियेंत हवेचा आघात प्राणावर होत नसून प्राणाचा आघात हवेवर होतो असे समजावे. आपल्या शरिरांतील सर्व प्रकारची कार्ये करणारी मूलशक्ति प्राण हीच असून तिची क्रिया सर्व शरीरभर चालू आहे; व ह्या प्राणशक्तीचे नियमन मन आणि इंद्रियें ही करीत असतात. येथवर ही सर्व उपपत्ति सुसंगत आहे. सांख्यशास्त्राने सांगितलेली अंतःसृष्टीची रचना येथवर अगदी स्पष्ट आणि सप्रमाण आहे. सांख्यशास्त्र में प्राचीनतम शास्त्र आहे. अंतःसृष्टीची सप्रमाण चर्चा ज्यांत केली आहे असा हा पहिलाच ग्रंथ होय. ज्या वेळी कोणत्याही प्रकारची सध्यासारखी उपकरणे अस्तित्वांत नव्हती, त्या पुराणकाळी ही ग्रंथरचना झाली हें मनांत आलें म्हणजे अत्यंत आश्चर्य वाटते ! जगांत जेथे जेथे कांहीं बुद्धिग्राह्य सिद्धांताची स्थापना करण्याचा यत्न आढळतो, तेथे तेथे श्रीकपिलांनी थोडातरी हातभार लावल्याचे आढळून येईल. अंतःसृष्टीचा शोध लावणारा कोणीही पंडित असो. या शास्त्राचे आद्यप्रवर्तक जे कपिल महामुनि त्यांची थोडीफार मदत त्याला अवश्य लागतेच. अंतःसृष्टीचा प्रत्येक शोधक, श्रीकपिलांचा थोडाबहुत ऋणी आहेच.
 येथवर सांगितलेले सांख्यसिद्धांत सुसंगत आणि आश्चर्यजनक आहेत हैं। कबूल करणे भागच आहे; तथापि सांख्यमत आम्हांस शेवटपर्यंत सारखेच ग्राह्य मानतां येत नाहीं; व कांहीं बाबतींत त्याच्यापासून आमच्या विचारांची दिशा निराळी होते असे आपणांस पुढे आढळून येईल. श्रीकपिलांनी सांगितलेल्या सिद्धांतांबद्दल आपण विचार करू लागलों, म्हणजे एक गोष्ट विशेषेकरून आपल्या लक्ष्यांत येते, ती ही की, श्रीकपिलांच्या एकंदर विचारसरणीत ‘उत्क्रांति' हीच मूळ कल्पना आढळून येते. त्यांच्या साच्या इमारतीचा पाया,