पान:विवेकानंद.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन-प्रकरण ३ रे.

१३१

प्रकरण ३ रे.


सांख्य आणि अद्वैत.


 तुलनात्मक दृष्टीने सांख्य व अद्वैत यांचा विचार सुरू करण्यापूर्वी सांख्यमताचे थोडेसे सिंहावलोकन करणे इष्ट आहे. असे करण्याने सांख्यमतांत उणीव कोठे आहे, आणि वेदान्ताने ती कशी भरून काढली आहे हे लक्ष्यांत येण्यास ठीक पडेल.
 हे सर्व विश्व प्रकृतीमुळे व्यक्त झालेले आहे असे सांख्यांचे मत असल्याचे तुमच्या लक्ष्यांत असेलच. केवळ स्थूल विश्वच प्रकृतीचे कार्य आहे असे नसून, विचार, इच्छा, बुद्धि, प्रेम, द्वेष इत्यादि भावना आणि शब्दस्पर्शरसादि गुण हेही प्रकृतिनिर्मितच आहेत. या विश्वांत ज्याचा ज्याचा आपणांस कोणत्यातरी रूपाने प्रत्यय येतो, ते सारे प्रकृतीने निर्माण केलेले आहे. प्रकृति तीन मूलतत्त्वांची बनली आहे. त्यांना सत्त्व, रज आणि तम अशी नावे आहेत. हीं तीन मूलद्रव्ये असून यांतूनच सर्व विश्व व्यक्त होते; आणि कल्पांत झाला म्हणजे हीं तीन मूलद्रव्यें साम्यावस्थेत राहतात. विश्व पुन्हा प्रतीत होण्याची वेळ आली म्हणजे या साम्यावस्थेत बिघाड होऊन, त्या तीन द्रव्यांत सरमिसळ होऊ लागते; व या सरमिसळीमुळे विश्व दृश्यत्वाला येते. प्रकृति व्यक्तदशेस येऊ लागली म्हणजे तिचे महत् हे रूप प्रथम प्रकट होते. या महत्तत्त्वापासून अहंकार निर्माण होतो. अहंकाराच्या एका भागापासून मन निर्माण होते. त्याचप्रमाणे अहंकाराच्या दुस-या भागापासून इंद्रिये आणि तन्मात्रे निर्माण होतात, आणि या तन्मात्रांपासून स्थूल द्रव्ये निर्माण होतात. तन्मात्रांचे स्वरूप अत्यंत सूक्ष्म आहे; इतकें कीं, ती पाहण्याचे अथवा त्यांचा आकार मापण्याचे साधन आपणापाशीं नाहीं. या अत्यंत सूक्ष्म स्वरूपाच्या तन्मात्रांपासून स्थूल अणू निर्माण होतात. यांचे अस्तित्व आपणांस आपल्या इंद्रियांनी जाणतां येते. मन, बुद्धि आणि अहंकार, यांच्या समवायी रूपाला चित्त अशी संज्ञा आहे. या चित्तापासून प्राणशक्ति निर्माण होते. प्राण म्हणजे श्वासोच्छ्वास नव्हत हें अवश्य लक्ष्यांत ठेवले पाहिजे. प्राण म्हणजे श्वासोच्छास असा दृढ समज पुष्कळांचा झालेला आहे. ही कल्पना तुम्ही आपल्या चित्तांतून प्रथम काढून टाका. प्राणशक्तीच्या आघाताच्या ज्या कांहीं क्रिया