पान:विवेकानंद.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन–प्रकरण २ रें.

१२९


जो पदार्थ कार्य असेल कोणत्याही कारणामुळे ज्याला अस्तित्व आले असेल-' अशा पदार्थाला आदि आणि अंत हीं अवश्यमेव असलीच पाहिजेत. ज्याला ह्मणून जन्म आहे त्याला मृत्यु नेमलेलाच आहे; 4 जातस्य हि ध्रुवो मृत्युः” ( गी. २. २७) असा सिद्धांत आहे. जर पुरुष समर्याद असेल तर त्यालाही मृत्यु अवश्य गांठीलच. तो अंतिम हेतु होऊ शकणार नाहीं; तसेच तो स्वतंत्रही असू शकणार नाही. तो कारणाचे कार्य होईल. कारणामुळे त्याची उत्पत्ति झाली असे होईल. तो अमर्याद असेल तरच सर्वव्यापी होऊ शकेल. श्रीकपिलांच्या मते असे पुरुष विश्वांत अनेक आहेत. पुरुष एक असून त्यांची संख्या अमर्याद आहे. प्रत्येक जीवांत व्यक्त होणारा पुरुष निरनिराळा आहे. तुमच्यापैकी प्रत्येकांत आणि माझ्यांतही एक एक पुरुष आहे. याप्रमाणे अनंत चक्रे असून त्यांपैकी प्रत्येक चक्र अनंत आहे असे सांख्यमत आहे. अशा अनंत चक्रांचेच हें विश्व बनले आहे. पुरुष जन्म घेत नाहीं अथवा त्याला मृत्यूही नाहीं. तो मनःस्वरूप नाहीं अथवा जडरूपही नाहीं. त्याच्या प्रतिबिंबित स्वरूपाचे ज्ञान मात्र आपणांस होऊ शकते. जर तो सर्वव्यापी असेल तर तो जन्ममृत्यूच्या पलीकडे असला पाहिजे हे ह्मणणे योग्यच आहे. आपली छायाप्रकृति त्याजभोंवतीं पसरते; आणि जन्म व मृत्यु ही त्या छायेचींच रूपे आहेत. पुरुष स्वतः अनंत आहे, येथपर्यंत श्रीकपिलांनी सांगितलेली उपपत्ति अत्यंत आश्चर्यजनक आणि कौतुकास्पद आहे, यांत संशय नाहीं.
 यापुढे याविरुद्ध जी कांहीं मते असतील त्यांचा विचार आपण करू. येथपर्यंत श्रीकपिलांनी केलेले पृथकरण सशास्त्र आणि पूर्ण आहे, आणि विश्वरचनेची यांनी सांगितलेली उपपत्ति अगदीं साधार असून तीविरुद्ध कांहीं प्रमाणे उभी करता येत नाहीत, असे आपल्या लक्ष्यांत येईल. प्रकृतीची उत्पात कशी झाली असा आपला प्रश्न होता. त्याला श्रीकपिलांनी उत्तर दिले की प्रकृति निर्माण झालेली नाहीं. तिला आदि-आरंभ-असा केव्हांच नव्हता. त्याचप्रमाणे पुरुषही अनादि असून सर्वव्यापी आहे आणि असे अनादि व सर्वव्यापी पुरुष अनेक आहेत असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या या शेवटच्या सिद्धांताबद्दल मात्र आम्हांस आक्षेप घ्यावयाचा आहे. त्यांच्या या शेवटच्या उत्तराहून अधिक चांगलें-अधिक बुद्धिग्राह्य-उत्तर आपणांस शोधावयाचे आहे.
 स्वा. वि. खं. ३-९.