पान:विवेकानंद.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन–प्रकरण २ रें.

१२७


मानणे अशास्त्र आहे. तर मग पुरुषाचे स्वरूप तरी काय ? इच्छा अथवा बुद्धि में पुरुषाचे रूप नव्हे; तरी या दोन्ही रूपांचे कारण पुरुषच आहे हे मात्र खरे. पुरुषाचे अस्तित्व आहे, म्हणूनच निष्पंदावस्थेत स्पंदांची उत्पत्ति होते, आणि त्यामुळेच मिश्रणेही बनतात. रासायनिक क्रियेंत कित्येक वस्तु मोठ्या चमत्कारिक स्वरूपाच्या असतात. उदाहरणार्थ, पोट्याश सायनाईड हा पदार्थ घ्या. सोन्याच्या खाणींतील मातीला आंच देऊन त्यांतून रासायनिक क्रियेने सोने काढतात, त्यावेळी भट्टींत पोट्याश सायनाईड या पदार्थाचा उपयोग करावा लागतो. भट्टी निवून गेल्यावर शुद्ध सोने बाहेर पडते, आणि त्याबरोबरच पोट्याश सायनाईड अगदी जसेच्यातसेंच बाहेर पडते. भट्टींत असतां त्याजवर दुस-या कोणत्याही पदार्थाची क्रिया घडल्याचे आढळून येत नाहीं, अथवा त्याचीही क्रिया दुस-या पदार्थावर घडल्याचे उघडकीस येत नाहीं; पण असे असले तरी त्याच्या साहाय्यावांचून भट्टीही नीट उतरत नाहीं असाही अनुभव येतो. भट्टी बरोबर उतरण्यास ते आवश्यकच आहे; पण अशा स्थितीत ते अक्रियही आहे. पुरुषाचे स्वरूप अशाच प्रकारचे आहे असे म्हणावयास हरकत नाहीं. पुरुष प्रकृतीशी एकरूप होत नाहीं.. तसेच तो महत् अथवा बुद्धि हीं रूपेंही धारण करीत नाहीं. तो पूर्ण आणि शुद्ध असा आहे. *मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते स चराचरम् । हेतुनानेन कौंतेय जगद्विपरिवर्तते ॥ (गीता ९-१० ). पुरुष केवळ साक्षीरूप आहे. त्याच्या साक्षित्वाने प्रकृति सर्व कांहीं निर्माण करते. चर अथवा अचर पदार्थ हे सर्व प्रकृतीपासून पुरुषाच्या साक्षित्वामुळे निर्माण झाले आहेत."
 प्रकृति स्वतः जर जड आहे, तर तिच्या ठिकाणीं चैतन्य कोठून येते ? चैतन्य हा पुरुषाचा भाग आहे. पुरुष केवळ चैतन्यरूप आहे. केवळ चैतन्य स्वरूप असणे हाच पुरुषाचा धर्म आहे. पुरुष हा वाचेच्या पलीकडचा आहे. तो अमुक, असे त्याजविषयी सांगता येत नाही. तसेच तो जाणताही येत नाहीं. तो स्वतः ज्ञानरूप आहे. ज्ञेय ह्मटले ह्मणजे ते बुद्धीच्या आटोक्यांत येते. पुरुष बुद्धीच्या पलीकडचा असल्यामुळे तो ज्ञेय होऊ शकत नाहीं. त्याचप्रमाणे पुरुष हा अहंकारस्वरूपही नाही. कारण, अहंकार हेही मिश्ररूप आहे. अहंकारांतही जडवस्तु आणि चैतन्य यांचे मिश्रण असते. त्यांत परावर्तित झालेले जे चैतन्य, तो पुरुषाचा भाग आहे. पुरुष चैतन्यस्वरूप