पान:विवेकानंद.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन- प्रकरण २ रें.

१२५

एकाच भागाची माहिती त्याला आहे. त्याच्या मनोभूमिकेपैकीं फक्त एकाच भागाचें ज्ञान त्याला होतें. हीच स्थिति विश्वालाही लागू आहे. विवेचक- बुद्धीचा आधार घेऊन आपण विश्वाच्या शोधाला निघालों, तर त्याच्या फक्त एकाच स्थितीचा शोध आपणांस लागेल; पण प्रकृतीची मर्यादा या एकाच भागांत संपते असे नाहीं. विचाराक्षमस्थिति, विचारातीतस्थिति आणि विचार- वतीस्थिति या तिहींचाही अंतर्भाव प्रकृतीच्या सीमेंतच आहे. त्याचप्रमाणें पिंडांत व्यक्त झालेला महत्तत्त्वाचा अंश, ब्रह्मांडांत प्रकट झालेले महत्तत्त्व, व त्यानंतर त्या तत्त्वांत घडून आलेल्या फेरफारामुळे बनलेले अनेक पदार्थ, या सर्वांचा अंतर्भाव प्रकृतीतच झालेला आहे.
 आतां प्रकृतींत उत्क्रांति आणि प्रतिक्रांति या कशा उत्पन्न होतात याचा विचार करणें अवश्य आहे. आतांपर्यंत केलेल्या विवेचनावरून प्रकृति ही स्वभावतःच जड आहे ही गोष्ट आपल्या लक्ष्यांत आली असेल. प्रकृति नियमबद्ध, मिश्रस्वरूप व जड आहे. मन, बुद्धि आणि इच्छा हीं सारीं जड़- स्वभाव आहेत. असे असतांही त्यांत चैतन्य दिसतें तें कोठलें ? या सर्वा- पलीकडे असलेला, व ज्याला पुरुष असें नांव सांख्यशास्त्रांत दिले आहे, त्याच्या चैतन्याचें हें सारें प्रतिबिंब आहे. जडपदार्थातील चैतन्य हे पुरुषाचें प्रतिबिंब मात्र आहे. प्रकृतींत जे अनेक फेरफार- उत्क्रांति, प्रतिक्रांति इत्यादि-घडत आहेत त्या सर्वांचें कारण हा पुरुष आहे; तथापि कांहीं विशिष्ट हेतूनें तो हैं सारें घडवून आणीत आहे असें मात्र समजूं नये. पुरुष निर्हेतुक आहे; तथापि पुरुषाच्या सहाय्यावांचून एकटी प्रकृति जड आहे हेंही विसरतां कामा नये. या दृष्टीनें विचार केला म्हणजे पुरुष हाच विश्वनियंता व परमे- श्वर आहे असे म्हणावयास हरकत नाहीं. 'परमेश्वराला इच्छा झाली आणि त्यानें सृष्टि निर्माण केली' असेंही कोणीकोणी म्हणतात. सामान्य व्यावहा• रिक दृष्टीनें हें म्हणणें वावगें आहे असें नाहीं; पण व्यवहारापलीकडे पाहाव- याचें म्हटलें म्हणजे, हें म्हणणे अशास्त्र आहे असें कबूल करणे भाग पडतें. इच्छा ही प्रकृतीपासून तिसरी किंवा चौथी पायरी आहे. इच्छा उत्पन्न होण्या- पूर्वीच दुसरे दोनतीन. पदार्थ निर्माण झाले आहेत. जर इच्छेमुळे हे सर्व विश्व निर्माण झालें असें म्हणावयाचें, तर तिच्या अगोदरचे दोनतीन पदार्थ कोणी निर्माण केले ? इच्छा है शुद्धरूप नसून मिश्ररूप आहे; आणि प्रत्येक