पान:विवेकानंद.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२४
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय

असावयाचाच; आणि तो तसा असल्यामुळे त्यांत पडणारे प्रतिबिंबही आपोआपच मर्यादित होते. महत्तत्त्वाची एखादी ठिणगी मात्र तेथे व्यक्त होते, आणि बाकीचा अनंत विस्तार बाहेर राहतो. भगवान् श्रीकृष्ण ह्मणतात, "विष्टभ्याहमिदं कृत्स्नं एकांशेन स्थितो जगत् । (गीता. १०.४२ ). मी इतका मोठा आहे की, हे सारे विश्व माझा एक अंशमात्र आहे. आपणांस परमेश्वर अपूर्णसा कां वाटतो याचे कारण आतां आपल्या लक्ष्यांत पूर्णपणे आले असेल. आपण स्वतःच्या अपूर्णत्वाचा आरोप त्याजवर करीत असतो. आणि आपल्या सध्याच्या स्थितीत त्याचे वास्तविक ज्ञान आपणांस होणे ही गोष्टच अशक्य आहे. त्याचे ज्ञान आपणांस करून घ्यावयाचे असेल, तर विवेचकबुद्धीने आणि क्षुद्र अहंकाराने आंखून दिलेल्या मर्यादेचे उल्लंघन करून जाण्याशिवाय दुसरा एकही मार्ग आपणांस मोकळा नाहीं. "यदा ते मोहकलिलं बुद्धिर्यतितरिष्यति । तदा गंतासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ॥ ( गीता २. ५२ ), " वैगुण्यविषयावेदा निस्वैगुण्यो भवार्जुन । निद्वंद्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ॥” ( गीता २. ४५ ). इत्यादि श्रुतिवचने हेच आपणांस पुनःपुनः सांगत आहेत. विचार जेथून उद्भवतात त्यापलीकडील प्रदेशांत प्रवेश केल्यावांचून विश्वाचे खरे ज्ञान आपणांस होणार नाही. शास्त्रांचे काम ह्मटले ह्मणजे, त्रिगुणात्मक प्रकृतीने उत्पन्न केलेल्या विश्वाचे ज्ञान सांगावयाचे इतकेच आहे. ती आपणांस त्रिगुणांपलीकडे नेऊ शकत नाहीत; ती आपणांस गुणातीत करू शकत नाहीत आणि आपण गुणातीत झालों तरच विश्वांत सर्वत्र एकात्मभाव आहे हे आपणांस समजेल.
 आतांपर्यंत केलेल्या विवेचनावरून पिंड आणि ब्रह्मांड यांची रचना एकाच प्रकारे झाली असल्याचे दिसून येईल. त्याचप्रमाणे पिंडरचनेतील एक लहानसा विशिष्ट अंश मात्र आपल्या जाणिवेत येतो, हेही आपल्या लक्ष्यांत आलेंच असेल. विचाराक्षमस्थिति अथवा विचाराततिस्थिति यांजबद्दल आपणांस कांहींच जाणीव होत नाहीं. जीत अहंकारजागृति असते अशा स्थितीची मात्र ओळख आपणांस आहे. 'मी पापी आहे' असे एखादा मनुष्य म्हणाला, तर हे त्याचे म्हणणे निवळ मूर्खपणाचें नाहीं काय ? ज्याला स्वतःची पूर्ण ओळख झाली नाही, त्याने स्वतःबद्दल मी अमुक आहे' असे म्हणावें हें मूर्खत्व नव्हे तर काय ? स्वतःबद्दलचे संपूर्ण ज्ञान त्याला झालेले नाही. स्वतःतील फक्त