पान:विवेकानंद.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.]

वेदांतमताचे सामान्य निरीक्षण.

व्याससूत्रांवरहि अनेक सिद्धांतकारांच्या अनेक टीका आहेत. सामान्यतः विचार करतां आर्यावर्तात सध्या तीन प्रकारची मते विशेष प्रचलित आहेत. या तीन मतांच्या प्रवर्तक आचार्यांनी आपापल्या मतानुसार श्री व्याससूत्रांवर टीका केल्या आहेत. या तीन मतांस द्वैत, विशिष्टाद्वैत व अद्वैत अशी नांवे आहेत. द्वैत आणि विशिष्टाद्वैत या दोन मतांचे अनुयायी आर्यावर्तात अधिक असून त्या मानाने खरे अद्वैतमतवादी कमी आहेत. आतां या तिन्ही मतांचा विचार आपणास करावयाचा आहे. हा तिन्ही मते जरी भिन्न आहेत तरी त्या सर्वांचा पाया एकच आहे ही गोष्ट विशेष लक्ष्यात ठेवण्यासारखी आहे. तो पाया ह्मटला ह्मणजे सांख्यदर्शन हा होय. न्याय आणि वैशेषिक या दर्शनांशीं सांख्यदर्शनाचे बहुतांशी साम्य असून त्यांत जो फरकआहे तो कांहीं क्षुल्लक बाबतींत मात्र आहे.
  । द्वैत, विशिष्टाद्वैत आणि अद्वैत या तिन्ही प्रकारच्या वेदान्त्यांचे तीन गोष्टींसंबंधी मतैक्य आहे. परमेश्वराचे अस्तित्व या तिन्ही मतांस मान्य आहे. त्याचप्रमाणे वेदग्रंथ हे अपौरुषेय आहेत हेंहि त्यांस मान्य असून कल्पाच्या कल्पनेचा अनुवाद ही तिन्ही मते करतात. आतां कल्प ह्मणजे काय याचा विचार या ठिकाणी अवश्य आहे. जी जी वस्तु या विश्वांत व्यक्तदशेस आली आहे त्या प्रत्येक वस्तूचे मूलद्रव्य आकाश हेंच आहे. त्याचप्रमाणे गुरुत्वाकषर्ण, आकर्षण, प्रसारण अथवा सजीवपण या सर्वांच्या ठिकाणी जी कांहीं शक्ति दृग्गोचर होते त्या सर्व प्रकारच्या शक्तीचे मूळ अधिष्ठान प्राण हेच होय. प्राणाचा आघात आकाशावर झाला ह्मणजे या दोहोंच्या संयोगाने विश्व दृश्य होऊ लागते. विश्व में नवीन निर्माण होत नसून अव्यक्तरूपांतून व्यक्तरूपांत मात्र येतें ही आर्यांची मुख्य उपपत्ति आहे. विश्व निर्माण होते अशी जी कल्पना पाश्चात्त्यांत आहे तिचा अनुवाद करणारा असा एकही पंथ हिंदुस्थानांत नाहीं. विश्व निर्माण होणे ह्मणजे ते नवीन निर्माण होत नसून पूर्वीच्या अव्यक्तदशेतून व्यक्तदशेत येते असे आमचे ह्मणणे आहे. कल्पास आरंभ होण्यापूर्वी आकाश अगदीं निष्पंद व अव्यक्त स्थितीत असते. या स्थितीनंतर प्राणाचा त्याशी संयोग होऊ लागतो व त्यामुळे एकामागून एक पदार्थ व्यक्त होऊ लागतात. याच रीतीने झाडेझुडपे, पशुपक्ष्यादि प्राणी, मनुष्ये आणि तारे व ग्रहादि आकाशस्थ गोल या सर्वांची उत्पत्ति झाली आहे. या व्यक्त