पान:विवेकानंद.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन- प्रकरण २ रें.

११९


नाहीं, त्याचप्रमाणें विचारातीतबुद्धीही कधीं चुकत नाही. किंबहुना या बाबतींत विचारातीतबुद्धि उपजतबुद्धीहून अधिक अचूक आहे, आणि तिचें क्षेत्र विवेचक-बुद्धीच्या क्षेत्राहून अधिक विस्तृत आहे; इतकें की त्या क्षेत्राला मर्यादा नाहीं.विचारातीतबुद्धि ही बुद्धीची अत्युच्च स्थिति आहे. ज्याप्रमाणे महत्तत्त्वाचीं हीं तीन रूपें एका मनुष्यांत- पिंडांत-दृग्गोचर होतात, त्याचप्रमाणे या तत्त्वाचीं ह्रीं तीन रूपें ब्रह्मांडांतही भरून राहिली आहेत.
आतां येथे एका नाजुक प्रश्नाचा विचार आपणांस करावयाचा आहे. सर्व दृष्टींनीं परिपूर्ण अशा परमेश्वरानें जर हें विश्व निर्माण केले आहे, तर त्यांत अपूर्णता कां आढळते ? असा प्रश्न वारंवार पुढे येत असतो; याकरितां त्याचा विचार करणे अवश्य आहे. अस्तित्वाचा जो लहानसा भाग आपल्या विवे-चकबुद्धीच्या आटोक्यांत येतो, त्याला आपण विश्व या संज्ञेनें ओळखतों.आपली दृष्टि जितक्या लांबवर आपणांस पोहोचवितां येते अथवा आपल्या विवेचकबुद्धीला आटोकाट ताण देऊन तिच्या द्वारा ज्याबद्दल आपणांस कांहीं कल्पना करतां येते, त्यांतच आपल्या विश्वाचा अंतर्भाव होतो. या मर्यादेच्या बाहेर काय आहे याचा शोध आपणांस लागत नाहीं. विश्वाचा विस्तार कितीही मोठा झाला तरी त्याला आपल्या बुद्धीची मर्यादा आहे. हें लक्ष्यांत आणले ह्मणजे वरील सारखा प्रश्नच उपस्थित करतां येत नाहीं असे आपणांस आढळून येईल. एखाद्या मोठ्या वस्तूचा एखादा लहानसा तुकडा आपण “हाती घेतला तर तो अपूर्ण दिसावा हें रास्तच आहे. हें विश्व अपूर्ण आहे असें आपणांस वाटतें. याचें कारण आपण त्याच्या ठिकाणी अपूर्णत्वाचा मिथ्यारोप करतों हेंच होय. आपला हा आरोप मिथ्या कसा आहे तें आतां पाहूं. विवेचकबुद्धीचें स्वरूप काय आहे? आपण ज्याला ज्ञान असें नांव देतों त्या ज्ञानाचे स्वरूप तरी काय आहे? ज्ञान ह्मणजे सादृश्य अथवा साधर्म्य. आपण रस्त्यांत गेलों आणि समोर दोन पायांचा आणि डोकें करून चालणारा असा एक प्राणी पाहिला, त्या प्राण्याचें दर्शन झाल्याबरोबर 'तो 'मनुष्य ' आहे, असें ज्ञान आपणांस होतें. आपण पूर्वी अनेक मनुष्यें • पाहिलेली असतात आणि त्यांच्या प्रतिमा आपल्या मनःपटावर चित्रित झा-लेल्या असतात. ज्यावेळी आपण तो प्राणी पाहिला, त्याचवेळीं त्याचें साध्य आपल्या चित्तांत असलेल्या कांहीं विशिष्ट प्रतिमांशी आहे असे आपणांस आढ