पान:विवेकानंद.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन–प्रकरण २ रें.

११५


हे सर्व तुम्ही उत्तम रीतीने चित्तावर बिंबवून घ्या. हे यथार्थ रीतीने चित्ताला पटणे फार कठीण आहे. विशेषतः तुम्हां पाश्चात्यांमध्ये मन आणि जडवस्तु यांसंबंधी इतक्या कांहीं विचित्र कल्पना भरल्या आहेत की, त्या नाहींशा होऊन त्यांच्या जागी या नव्या कल्पनांचा प्रवेश होणे अत्यंत बिकट कर्म आहे. पाश्चात्य तत्त्वज्ञानपद्धतीशी माझा प्रथम परिचय झाल्यामुळे मला स्वतःला ही विचारमालिका समजावून घेणे फारच जड गेले.
येथपर्यंत एका व्यक्तीच्या अथवा व्यष्टीच्या देहरचनेचा विचार झाला. हीच सर्व विचारपरंपरा विश्वरचनेलाही लागू आहे. विश्वांत भासमान होणाच्या वस्तूंचीं नामरूपे काढून टाकून त्यांचा एक प्रचंड विस्तार कल्पिला, तर त्या रूपाला अव्यक्त असे नांव देता येईल. प्रत्यक्ष दिसणारे रूप आणि त्यामुळे प्राप्त होणारे नाम हीं वजा केली, तर केवळ वस्तु' इतकीच संज्ञा शिल्लक राहील. या अव्यक्तरूपांत घडामोड सुरू झाली म्हणजे जे पहिलें रूप त्यांतून व्यक्त होते त्याचे नांव महत् असे आहे. ज्याप्रमाणे दुधाचे दहीं बनते व त्यांतून पुढे लोणी निघते, त्याचप्रमाणे अव्यक्तांतून महत् बनते व महत्तत्त्वापासून बुद्धि आणि अहंकार ही निर्माण होतात. महत्तत्त्वांतून हीं बनतात असे म्हटले म्हणून महत्तत्त्वांत व त्यांच्यांत गुणमूलक असा कांहीं फरक पडतो असे मात्र समजू नये; कारण, महत्तत्त्वानेच हीं रूपें धारण केलेली आहेत. महत्तत्त्वाचे रूप सुक्ष्म असते व त्या मानाने या दोन तत्त्वांचे रूप अधिक स्थूल असते, इतकेच. अशा रीतीने हे सारे विश्व क्रमाक्रमाने प्रतीत झाले आहे. याचे अगदी पहिलें अथवा मूलरूप म्हटलें म्हणजे प्रकृति-अव्यक्तहे होय; त्यापासून विश्वव्यापी महत् निर्माण होते व महतूपासून विश्वव्यापी अहंकार निर्माण होतो; व या अहंकारांतून दोन प्रकारचा तत्त्वसमूह निर्माण होतो. या तत्त्वसमूहाच्या एका प्रकारांतून सर्व ज्ञानेंद्रियें निर्माण होतात; व दुस-या प्रकारांतून तन्मात्रे निर्माण होतात. तन्मात्रांपासून महाभूतें निर्माण होतात आणि महाभूतांपासून हे सारे विश्व निर्माण होते. विश्वरचनेचा नकाशा सांख्यांनी याप्रमाणे काढला आहे. जी रचना ब्रह्मांडांत दृग्गोचर होते, तीच पिंडांतही असते असे सांख्यांचे मत आहे.
 ज्या क्रमाने में विश्व व्यक्त होते, त्याच क्रमाने एक व्यक्तीही-पिंड-व्यक्त होते असे सांख्यमत आहे. मनुष्यही प्रथम अव्यक्तदशेतच असतो; ह्मणजे त्यांत