पान:विवेकानंद.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११४
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


सूक्ष्म आहे, इतकाच काय तो फरक त्यांमध्ये आहे. यांपैकीं सूक्ष्म स्वरूप प्रथम निर्माण होते आणि नंतर त्याचेच स्थूलरूप होते. इंद्रियविज्ञानशास्त्राने अर्वाचीन काळी जे कांहीं शोध लावले आहेत त्यांचा मथितार्थही हाच आहे. मन आणि देह यांत गुणमूलक फरक असणे मूलत:च अशक्य असल्यामुळे, सांख्यांचा हा सिद्धांत एकदम कबूल करण्यास नड नाहीं. दुसरे असे की, इंद्रियविज्ञानशास्त्राचीही संमति त्याला आहे. अशा स्थितींत ही गोष्ट नाकबूल करून, निरर्थक डोकें पिकविण्याचे कारण आपणांस नाहीं. मनाचे स्वरूप मेंदूच्या स्वरूपाहून निराळे आहे असे कित्येक म्हणतात; पण त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावर वादविवाद करणे म्हणजे, व्यर्थ कालक्षेप करून आपणांस निष्कारण त्रास करून घेण्यापलीकडे त्यांत कांहींच फायदा नाहीं. महत्तत्त्वापासून अहंकार होतो हे अगोदर सांगितलेच आहे. अहंकार हे अत्यंत सूक्ष्म असे जडरूप आहे. अहंकारापासून दोन प्रकारचे समुदाय निर्माण होतात. यांपैकी एका समुदायांतून इंद्रियें निर्माण होतात. इंद्रियांत दोन प्रकार आहेत; ज्ञानेंद्रियें व कर्मेंद्रियें. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांचे ज्ञान ज्यांच्या द्वारा होते ती ज्ञानेंद्रियें; आणि हस्तपादादि इंद्रियें ही कर्मेंद्रियें होत. आपल्या जडदेहावर दिसणारी इंद्रियें-कान, डोळे इत्यादि-हीं खरी इंद्रियें नव्हत हें मार्गे एकवार सांगितलेच आहे. खरी इंद्रिये म्हणजे मेंदूतील गोलक होत. अहंकाराच्या स्वरूपांत बदल होऊन त्यांतून हे गोलक निर्माण झाले आहेत. त्याच प्रमाणे त्या गोलकांशी संलग्न असलेले ज्ञानतंतूही अहंकारांतूनच निर्माण झाले आहेत. अहंकाराच्या दुस-या प्रकारच्या समुदायांतून पंचतन्मात्रे निर्माण होतात. तन्मात्रांचे स्वरूप अत्यंत सूक्ष्म असून ती जड आहेत. तन्मात्रे दृष्टीने पाहणे शक्य नाहीं; तथापि त्यांच्या अस्तित्वाचे ज्ञान आपणांस होते. फुलांतून वासाचे कण बाहेर पडतात व त्यांचा वास आपणांस येतो; पण ते कण आपणांस दिसणे शक्य नाही. तन्मात्रांच्या स्वरूपाचे सविस्तर विवेचन पूर्वी एकवार झालेच आहे. अहंकारापासून पांच तन्मात्रे निर्माण होतात; आणि या पांच तन्मात्रांपासून पंचमहाभूते निर्माण होतात; व या पंचमहाभूतांपासून हवा, पाणी, पृथ्वी इत्यादि दृश्य वस्तू निर्माण होतात. सृष्टीत जें कांहीं आपण पाहू शकतों, अथवा कोणत्याही इंद्रियाच्या साहाय्याने ज्याचे अस्तित्व आपणास जाणतां येते, ते सर्व पंचमहाभूतांतूनच निर्माण झाले आहे.