पान:विवेकानंद.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन--प्रकरण २ रें.

११३

पंडित जडसृष्टीच्या अभ्यासाने ठरवूं पाहत आहेत. मार्ग परस्परभिन्न असले, तरी दोघांचा शेवटचा मुक्काम एकच आहे; ही गोष्ट आपल्या लक्ष्यांत आलीच असेल.
 नव्या कल्पाला आरंभ होतो, त्यावेळी अव्यक्त प्रकृति प्रथम महत् या रूपानें प्रकट होते हैं आरंभी सांगितलेंच आहे. याला आपण विश्वबुद्धि असें नांव देऊं. महत्तत्त्व या शब्दाचा पदश: अर्थ मोठें तत्त्व असा आहे. विश्वबुद्धि हैं प्रकृतीचे पहिले व्यक्तरूप आहे. महत्तत्त्व म्हणजे स्वतःची जाणीव अथवा अहंकार असेंही कोणी म्हणतात; परंतु तो अर्थ चुकीचा आहे. अहंकार हैं महत्तत्त्वाचें एक रूप आहे ही गोष्ट खरी; पण महत्तत्त्व म्हणजे अहंकार नव्हे. अहंकार हा महत्तत्त्वाचा एक भाग मात्र आहे. महत्तत्त्व हें विश्वव्यापी असून, अहंकार हा व्यक्तिव्यापी आहे. महत्तत्त्वाचे खेळ साच्या विश्वांत चालतात, आणि अहंकाराचे खेळ एकाच देहांत प्रत्ययाला येतात. अहंकार, विचारा- समस्थिति ( Sub-consciousness ), आणि संवेदनातीत स्थिति ( Super-consciousness ), या सर्वांवर महत्तत्त्वाचें आवरण आहे. ‘महत्तत्त्व या सर्वांपलीकडचें असून ह्रीं त्याचींच रूपें आहेत. आपल्या या सृष्टीत अनेक प्रकारच्या घडामोडी प्रत्यहीं चालू आहेत; यांपैकी कित्येक आपल्या नजरेसमोर घडत असतात आणि त्या आपणांस जाणतां येतात. दुसऱ्या कित्येक इतक्या सूक्ष्मस्वरूपाच्या असतात की, त्या मानवी इंद्रियांच्या आटोक्यांत येणें शक्यच नाहीं. या सूक्ष्म घडामोडीही महत्तत्त्वच करीत असतें. याशिवाय दुसऱ्या कित्येक घडामोडी अशा स्वरूपाच्या असतात कीं, त्या आपले मन अथवा आपली तारतम्यबुद्धि यांच्या आटोक्यांत येऊं शकत नाहींत. या अनेक प्रकारच्या कार्यपरंपरांचा अंतर्भाव महत्तत्त्वांतच झालेला आहे. महत्तत्त्वांतून या घडामोडी कशा होतात, याचें अधिक स्पष्टीकरण करण्यासाठी एकाच व्यक्तीचें उदाहरण घेऊं.
 महत्तत्त्वापासून अहंकार निर्माण होतो. महत्तत्त्व आणि अहंकार हीं दोन्ही जडच आहेत. जडदेह आणि मन यांत जो फरक आहे तो फक्त परिमाणाचा -कमीअधिकपणाचा आहे. त्यांच्या स्वरूपांत गुणमूलक फरक मुळींच नाहीं. एकाच पदार्थातून ही दोन्ही निर्माण झाली असल्यामुळे त्यांच्यांत गुणमूलक फरक असणे शक्य नाही. त्यांपैकी एकाचें स्वरूप स्थूल असून दुसऱ्याचें
 स्वा. वि. खं. ३-८.