पान:विवेकानंद.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११२
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


नाश झाला असे आपण म्हणतो. नाश म्हणजे कारणरूपांत लय होणे इतकाच खरा अर्थ आहे. कोणत्याही वस्तूंचा आत्यंतिक नाश कधी होऊच शकत नाहीं. आपल्या अर्वाचीन भौतिक शास्त्रकारांनी हा सिद्धांत इतक्या चोख रीतीने सिद्ध केला आहे की, त्याबद्दल कसलाच वाद उरलेला नाही. नाश म्हणजे कारणरूपाला परत जाणे' असे जे श्रीकपिलांनी कित्येक युगांपूर्वी म्हटले, तेच सध्याची भौतिकशास्त्रे अक्षरशः म्हणत आहेत ! स्थूलरूपांतून सूक्ष्मरूपांत लय पावणे इतकाच अर्थ नाश या शब्दाचा आहे. कोणत्याही पदार्थाचा आत्यंतिक नाश कधीही होत नसून त्याचे रूपांतर मात्र होते, ही गोष्ट प्रत्यक्ष प्रयोगाने रसायनशास्त्री तुम्हांस दाखवू शकतात. जर एखाद्या काचेच्या नळींत जळती मेणवत्ती व कॉस्टिक सोड्याची कांडी घालून मेणबत्ती अखेरपर्यंत जळू दिली, व नंतर कॉस्टिकची कांडी वजन केली, तर ती पूर्वीपेक्षां वजनाने वाढली असल्याचे आढळून येईल; आणि ही वाढ बरोबर मेणबत्तीच्या वजनाइतकीच आहे असे निदर्शनास येईल. यावरून मेणबत्ती कोठे गेलीकशी नाश पावली-तें आपल्या लक्ष्यांत येईल. मेणबत्तीचे स्थूलरूप नष्ट होऊन ती हळुहळू सूक्ष्मरूप धारण करीत होती आणि त्या सूक्ष्मरूपाने ती कॉस्टिकच्या पोटांत प्रवेश करीत होती हे अगदीं उघड झाले. यावरून कोणत्याही वस्तूचा आत्यंतिक नाश कधीही होत नाहीं; पण तिचे फक्त अधिक सूक्ष्मरूपांत-कारणरूपांत-रूपांतर मात्र होते, हे नि:संशय सिद्ध होते. आज आपल्या शास्त्रीय ज्ञानाची वाढ इतकी झाली आहे कीं, एखादी वस्तु पूर्णत्वाने नाश पावते असे म्हणणारा कोणी भेटलाच तर, जनदृष्टीने त्याची बोळवण वेड्यांच्या इस्पितळांत करावी लागेल. अक्षरशत्रू लोकांवांचून असे शब्द सध्याच्या काळी कोणीही उच्चारणार नाही. आमच्या प्राचीन तत्त्ववेत्त्यांनी त्या काळीं जें कांहीं सांगितले, त्याचीच पुनरावृत्ति अर्वाचीन ज्ञानमार्ग करीत आहे ही गोष्ट मोठ्या आश्चर्याची म्हटली पाहिजे ! प्राचीन तत्त्ववेत्त्यांनी अंतःसृष्टीचा अभ्यास करून विश्वरचनेसंबंधी सिद्धांत प्रस्थापित केले. त्यांनी विशेषतः मनाचा अभ्यास करून हे शोध लावले आहेत. अर्वाचीन भौतिक शास्त्रकार, जडाविश्वाचा अभ्यास करीत आहेत. मनाच्या निरनिराळ्या शक्ती आपल्या प्रत्ययाला येतात, त्यांचे पृथक्करण करून व त्यांचा अभ्यास करून प्राचीन तत्त्वज्ञांनी जे सिद्धांत ठरविले, तेच सिद्धांत अर्वाचीन