पान:विवेकानंद.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन-प्रकरण १ लें.

१०७

जें कांहीं प्रत्यक्ष दिसत आहे, तीं सारीं जड शरीरें असून त्यांच्यामागें सूक्ष्मदेह आहेत. त्या सूक्ष्मदेहांच्या मागें विश्वव्यापक अहंकार व त्या अहंकाराच्या मागें महत् (विश्वव्यापकबुद्धि) आहे. ह्रीं सारीं प्रकृतीच्या आधीन असून प्रकृतींतूनच ती निर्माण झाली आहेत. प्रकृतीच्या मर्यादेबाहेरचें असें एकही तत्त्व यांत नाहीं. आपण सर्व मनुष्यें त्या विश्वव्यापक अहंकाराचींच रूपें आहोत. आपणा सर्वोचीं मनें त्या महत्तत्त्वांतून निर्माण झाली आहेत. महत्तत्त्व हे एखाद्या मोठ्या खजिन्यासारखें असून त्यांतून लागेल तेवढा भाग घेऊन आपण आपलीं मनें बनविलीं आहेत; आणि त्यांतून थोडथोडा भाग प्रत्यहीं आपण शोषीत असतो. आपल्या अंतरिंद्रियांस लागणारी द्रव्यें आपण विश्वांतून घेत असते पण आपल्या जडशरिराला लागणारी द्रव्यें मात्र, आपणांस आपल्या मातापितरांकडून मिळत असतात असें सांख्यमत आहे. आनुवंशिक संस्कार आणि पुनर्जन्म या दोन्ही उपपत्तींचा अंतर्भाव या सांख्यमतांत झाला आहे. स्वतःचें शरीर बनविण्याकरितां जीवात्म्याला जीं द्रव्ये लागतात, तीं त्याला आनुवंशिक संस्कारांनुरूप मातापितरांपासून प्राप्त होतात.
 विश्वोत्पत्तीच्या क्रियेंत उत्क्रांति आणि प्रतिक्रांति अशा दोन क्रियांचा अंत र्भाव होतो, हा सांख्यांचा सिद्धांत आतां आपल्या ध्यानीं आला असेलच. या सिद्धांताबद्दल आतां आपणांस विचार करावयाचा आहे. अव्यक्त प्रकृतींतून सर्व विश्व उत्क्रांत होतें, आणि कल्पाच्या शेवटीं प्रतिक्रांति होऊन तें अव्य-- तांत जातें. अहंकाराचा थोडातरी अंश असल्यावांचून कोणत्याही पदार्थाला अस्तित्व असणें शक्यच नाहीं, असें सांख्यांचे मत आहे. विश्वांत जें जें कांहीं दृश्यत्वाला आलें आहे त्याचें मूलद्रव्य अहंकार हेंच होय. या मताचा विस्तार- पूर्वक विचार आपण पुढे करूंच; पण या मताची सिद्धि सांख्यमतानुयायी कशी करतात याचें थोडें दिग्दर्शन करणें वावगें नाहीं. माझ्या समोरील या मेजाकडे मी पाहतों त्यावेळी त्याचे प्रकाशकिरण माझ्या डोळ्यांकडे धांव घेतात. डोळ्यांच्या द्वारें ते हगिंद्रियाकडे रवाना होतात आणि तेथून त्यांची रवानगी मनाकडे होते. इतकी क्रिया पूर्ण झाली म्हणजे मनाची प्रतिक्रिया सुरू होते, व त्यानें त्या पदार्थाबद्दल जो कांहीं निश्चय केला असेल, त्याला अनुरूप असें नांव मी त्या पदार्थाला देतों आणि 'हें मेज' असें मी म्हणतों. माझ्यासमोरील पदार्थाचें- त्याचें स्वतःचें असें-रूप काय आहे हे मला माहीत