पान:विवेकानंद.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०६
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय

होणें शक्य नाहीं, हेंही उघडच आहे. ही अडचण श्रीकपिलांनीं कशी दूर केली आहे तें पाहूं. प्रकृति जरी अनादि आहे तरी हें अनादित्व अखंड आहे असें नाहीं. पुरुषाचें अथवा आत्म्याचें अनादित्व ज्याप्रमाणें अखंड स्वरूपाचें आहे, त्याप्रमाणें प्रकृतीचें अनादित्व अखंड नाहीं; कारण, प्रकृति ही कांहीं एकच व्यक्ति नाहीं; ती समष्टिरूप आहे. आपण एखाद्या नदीच्या प्रवाहाकडे पाहिले तर, प्रत्येक क्षणीं प्रवाहाला नवें पाणी येऊन मिळत आहे असे आपणांस दिसेल. पाण्याचे हजारों बिंदू, प्रत्येक क्षणीं नवे येत आहेत आणि पूर्वीचे बिंदू पुढे निघून जात आहेत असे आपणांस आढळून येईल. हे हजारों बिंदू मिळूनच नदीचा प्रवाह बनला आहे. प्रवाह एकसार असला तरी त्यांत हजारों बिंदूंची अदलाबदल होत असतेच. प्रवाहाचें प्रवा- हत्व कायम राहूनही त्यांत अदलाबदल होत असते. त्याचप्रमाणे प्रकृतीच्या प्रवाहांत क्षणोक्षणीं बदल होत असतो; पण पुरुषाची अथवा आत्म्याची गोष्ट याहून वेगळी आहे. त्याच्या स्वरूपांत कोणत्याही काळी बदल होत नाहीं. त्याचें रूप सर्वत्र आणि सर्व काळी एकसारखेंच आहे. यामुळे प्रकृतीनें उप- स्थित केलेल्या बंधनांतून आत्मा मोकळा होऊं शकतो. अगोदर सांगितलेल्या अडचणींचें निवारण सांख्यांनी याप्रमाणे केलें आहे.
 सांख्यांच्या सूक्ष्मेंद्रियशास्त्राची ( Psychology ) आणखीही एक विशिष्ट उपपत्ति आहे. ज्या विशिष्ट तत्त्वांस अनुसरून एका मनुष्यदेहाची रचना होते, त्याच तत्त्वांस अनुसरून सर्व विश्वाची रचना झाली आहे असे एक विशिष्ट सांख्यमत आहे. पिंड आणि ब्रह्मांड हीं तत्त्वतः एकाच स्वरू- पाची आहेत. ज्याप्रमाणे एका नरदेहांत मनसंज्ञक विशिष्ट इंद्रिय आढळून येतें, त्याचप्रमाणे सर्व विश्वाचें - विश्वव्यापक असे एक मन आहे. कल्पारंभी विश्व व्यक्तदशेला येऊं लागतें तेव्हां महत्तत्त्व ( बुद्धि ) प्रथम उदय पावते व पाठीमागून क्रमानें विश्व उदय पावतें. " "प्रकृतेर्महांस्ततोऽहंकारस्तस्मा-द्वणश्च षोडशकः ।'तस्मादपि षोडशकात्पंचभ्यः पंचभूतानि” '' प्रकृती-पासून महत्तत्त्व उत्पन्न होतें; महत्तत्त्वापासून अहंकार होतो; अहंकारापासून अकरा इंद्रियें व पंचतन्मात्रें या सोळा तत्त्वांचा समुदाय निर्माण होतो; आणि या सोळा तत्त्वांपैकी पंचतन्मात्रांपासून आकाशादि पंचभूतें होतात.' अशा रीतीनें विश्व हें एक प्रचंड शरीरच आहे असे श्रीकपिलांचें मत आहे. आपणांस