पान:विवेकानंद.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन–प्रकरण १ लें.
१०१

इंद्रियांच्या द्वारे आंतील ज्ञानतंतूंचा स्पंद होऊन तो मनाकडे जातो. आपण एखाद्या पदार्थाकडे पाहतो त्यावेळी, त्या पदार्थांतील तेजाचे किरण आकाशावर ( Ether ) स्पंद निर्माण करीत असतात, व ते स्पंद आपल्या दृग्ज्ञानतंतूला ( Optic nerve ) स्पर्श करून तेथे स्पंदांची उत्पत्ति करतात. आकाशावर प्रकाशकिरणाने उत्पन्न केलेला स्पंद आपणांस दिसत नाहीं, तथापि तेथला स्पंद माझ्या दृग्ज्ञानतंतूवर येऊन आदळल्यावांचून, त्या प्रकाशकिरणांचे ज्ञान मला होणार नाहीं. याचप्रमाणे आपल्या कर्णेद्रियाचीही गोष्ट आहे. ध्वनीचे स्पंद आपल्या दृष्टीने आपणांस दिसत नाहीत; तथापि त्या स्पंदांचा संयोग आपल्या कणेंद्रियाशीं झाल्यावांचून, आपणांस ध्वनि ऐकू येणार नाहीं. आकाशावरील स्पंद, तन्मात्रांनी निर्माण केलेला असतो. आतां हीं तन्मात्रे कशी निर्माण होतात याचा विचार केला पाहिजे. आमच्या आर्यतत्त्वज्ञांनी या प्रश्नाचे जे उत्तर दिले आहे, ते ऐकून तुह्मांला खरोखर फार आश्चर्य वाटेल. अहंकार हीं तन्मात्रे उत्पन्न करतो असे त्यांचे उत्तर आहे. अहंकारामुळे ( Self-conciousness ) तन्मात्रे आणि इंद्रियें उत्पन्न होतात.आतां, इंद्रियें ह्मणजे काय याचा विचार करू.
 उदाहरणार्थ, आपण आपल्या डोळ्यासंबंधी पाहिले, तर केवळ जड डोळा, पाहण्याची क्रिया करीत नाहीं असे आपणांस आढळून येईल. जर पाहण्याची क्रिया डोळ्यामुळे घडत असती, तर मृत मनुष्येही पाहू शकली असतीं; कारण, देहांतून आत्मा निघून गेला, तरी जड डोळ्यांत त्यामुळे कांहीं कमीपणा आलेला असतो असे नाही, पण मृत मनुष्ये पाहू शकत नाहींत हे आपणांस ठाऊक आहेच. यावरून पाहण्याची क्रिया केवळ डोळ्यामुळे होत नाही असे उघड दिसते. त्या मृत मनुष्यांतून जे कांहीं बाहेर निघून गेले त्याच्याच ठिकाणीं, या क्रियेचा कर्तेपणा असला पाहिजे हे उघड आहे. तोच खरा द्रष्टा असून, डोळे हे त्याचे बाह्यसाधन असले पाहिजे.
 या द्रष्टयाला इंद्रिय असें ह्मणतात. इंद्रिय नष्ट झाले म्हणजे बाहेरील जड साधनांचा कांहींच उपयोग नाहीं. याचप्रमाणे नाक हें एक साधन असून, त्याचेही एक निराळे इंद्रिय आहे. अर्वाचीन इंद्रियविज्ञानशास्त्रांत या इंद्रियांना, गोलक (Centres) असे नांव दिले आहे. हे गोलक मेंदूत असून खरीं इंद्रिये हीच होत. आपल्या देहावरील डोळे, कान इत्यादि अवयव हे केवळ साधनरूप आहेत; आणि इंद्रियें, हीं खरीं ज्ञानसाधने आहेत.