पान:विवेकानंद.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन - प्रकरण १ लें.

९३

तत्त्ववेत्त्यांनीं हजारों वर्षांमागे नमूद करून ठेवली आहे. ही गोष्ट खरोखर अत्यंत आश्चर्याची आणि कौतुकास्पद आहे. आजच्या काळचे आपले भौतिक शास्त्रज्ञही हीच गोष्ट सिद्ध करूं पाहत आहेत. ज्या परमाणूंचा हा स्थूल देह बनला आहे त्याच परमाणूंच्या सूक्ष्मतर रूपांतून मन आणि बुद्धि हीं निर्माण झाली आहेत, हेंच ते सिद्ध करूं पाहत आहेत. त्याचप्रमाणे विचार हा सुद्धां जड आहे. हीं सारीं दृश्यरूपें अव्यक्तांतूनच निर्माण झाली आहेत असें हळू हळू आपल्या प्रत्ययास येईल.
 आतां अव्यक्त म्हणजे काय याचा विचार करणें अवश्य आहे. अव्यक्त म्हणजे गुणत्रयाची साम्यावस्था असा अर्थ आहे. या तीन गुणांस सत्त्व, रज आणि तम अशीं नांवें आहेत. तम हैं शक्तीचे अगदी कनिष्ठ प्रतीचें रूप असून आकर्षण हे त्याचें कार्य आहे; रजोगुण है त्याहून उच्च प्रतीचे रूप असून प्रति- सारण हैं त्याचें कार्य आहे; आणि सत्त्व हें सर्वांत उच्च प्रतीचें रूप असून, रज आणि तम या दोन गुणांच्या कार्यावर ताबा ठेवणे हे त्याचें कार्य आहे. ज्यावेळीं रज आणि तम या दोन गुणांवर सत्त्वगुणाचा पूर्ण ताबा असतो, त्यावेळी ते दोन्ही गूण पूर्ण साम्यावस्थेत असतात. अशा वेळी ते व्यक्त होत नसल्यामुळे विश्वा- लाही दृश्य स्वरूप नसतें; आणि दृश्यस्वरूपाच्या अभावीं नाना आकार आणि निरनिराळी नामें यांसही अस्तित्व नसतें; परंतु ही साम्यावस्था बिघडल्याबरो- बर, या दोन गुणांपैकी एक अधिक उच्छृंखल होतो. एक गुण अधिक उच्छृंखल झाल्याबरोबर, दुसराही पूर्वीची साम्यावस्था स्थापना करण्याचा यत्न करूं लागतो. अशा रीतीनें आकर्षण आणि प्रतिसारण हीं सुरू होतात. हीं सुरू झालीं म्हणजे मूलशक्तीला गति प्राप्त होते, आणि गतीबरोबर विश्व उत्क्रांत होऊं लागतें. विश्वाची ही अवस्था प्रत्येक प्रलयाच्या काळी होत असते. एका वेळीं गुणत्रयाच्या साम्यावस्थेत बिघाड होऊं लागून त्यांत शक्तीच्या कमी- अधिकपणाची सरमिसळ होऊं लागते व विश्व व्यक्त होते. यानंतर ही व्यक्ता- वस्था पूर्वीच्या साम्यावस्थेला परत जाण्याची खटपट करूं लागते, व हळू हळू ही खटपट सफळ होण्याची वेळ येऊं लागते; ती पूर्ण सफळ झाल्याबरोबर पूर्वीची साम्यावस्था प्राप्त होऊन विश्व पुन्हा मूळच्या अव्यक्त स्थितींत परत जाते. अशी अव्यक्तावस्था कांहीं काळ राहिली म्हणजे पुन्हा या गुणत्रयाची घडी बिघडते व साम्यावस्थेंतून मुक्त झालेली शक्ति उच्छृंखल होऊन विश्व