पान:विवेकानंद.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९२
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय

बीज फोडून आणिलें मना । तेथे फळ तों दिसेना ।
वाढत वाढत पुढे नाना । फळे येती ॥ २ ॥
फळ फोडितां बीज दिसे । बीज फोडितां फळ नसे ।
तैसा विचार असे । पिंडब्रह्मांडीं ॥ ३ ॥

 विश्वाची उत्पत्ति आणि त्याची रचना यांजबद्दल अर्वाचीन ज्योतिर्विद् आणि इतर भौतिक शास्त्रज्ञ यांचे सिद्धांत काय आहेत यांची थोडीबहुत माहिती आपणांस आहे. त्याचप्रमाणे या शास्त्रांच्या सिद्धांतांमुळे जुन्या धर्मशास्त्रज्ञांची काय दशा झाली हेही आपणांस ठाऊक आहेच. भौतिकशास्त्राचा एक एक नवा शोध प्रसिद्ध होऊ लागला तसतसे जुन्या इमारतीचे धोंडे ढासळू लागले. प्रत्येक नवा शोध म्हणजे जणुकाय एक कुलपी गोळाच ! जुन्या पंडितांनी स्वसंरक्षणार्थ अनेक प्रकारचे उपाय योजिले व शास्त्रांचे शोध बंद पाडण्याकरितां सुचतील ते उपाय त्यांनी वेळोवेळी करून पाहिले; पण त्यांत त्यांना यश आले नाही.
 विश्वाची उत्पत्ति आणि तिच्याशी संलग्न असलेले दुसरे विषय यांजबद्दल पौर्वात्य शास्त्रज्ञांचे सूक्ष्मेंद्रियशास्त्र काय म्हणते, याचा आपण प्रथम विचार करू. पाश्चात्य भौतिकशास्त्रांनी अगदी अलीकडे जे सिद्धांत स्थापन केले आहेत त्यांशी आमच्या पौर्वात्य पंडितांचे सिद्धांत तंतोतंत जुळतात हे पाहून तुम्हांला खरोखर नवलच वाटेल. ज्या ठिकाणी कांहीं सिद्धांतांत उणेपणा आढळेल, तेथे तो उणेपणा अर्वाचीन भौतिकशास्त्रांच्या बाजूस असून पौर्वात्यशास्त्रज्ञ त्या बाबतीत पुढे गेले आहेत असे तुम्हांस आढळून येईल. निसर्ग ( Nature ) हा शब्द आपल्या ब-याच परिचयाचा आहे. याशी समानार्थक असे दोन शब्द प्राचीन आर्यतत्त्ववेत्त्यांनी योजिले आहेत. ते दोन शब्द प्रकृति आणि अव्यक्त हे होत. यांपैकी प्रकृति हा शब्द इंग्रजी Nature ( निसर्ग ) याच्या बराच जवळ जवळ आहे. अव्यक्त हा शास्त्रीय पारिभाषिक शब्द आहे. याचा अर्थ ‘जें व्यक्त झालेले नाहीं-नामरूपाला आलेले नाहीं-ते, असा आहे. अव्यक्त म्हणजे मूळरूप. या मूळ अव्यक्त स्थितींतून व्यक्त म्हणजे विश्व दिसू लागले. परमाणु आणि अणु, जडतत्त्वे आणि शक्ति व तसेंच मन आणि बुद्धि ही सारीं अव्यक्तांतूनच व्यक्त झाली आहेत. मन आणि बुद्धि हींसुद्धां जडपदार्थाचींच सूक्ष्मतर रूपे आहेत, ही गोष्ट आर्य-