पान:विवेकानंद.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन-प्रकरण १ लें.

९१

बऱ्याच जागा त्यांनीं सर केल्या. सूक्ष्मँद्रियशास्त्र व अतींद्रियशास्त्र यांचे बरे- चसे सिद्धांत खोटे आहेत असे अर्वाचीन भौतिकशास्त्रे सिद्ध करूं लागली. मी स्वतः या दोन्ही विद्यांत प्रवीण आहें असें नाहीं; तथापि त्यांचें जें तुटपुंजें ज्ञान मला आहे त्यावरून, या दोन्ही शास्त्रांतील मुख्य तत्त्वांत विरोध नसून त्यांत एकवाक्यता आहे असे मला आढळून आले आहे.
 सर्व विद्यांत मी प्रवीण आहे असें म्हणावयाचा अधिकार कोणाही एकाच व्यक्तीला प्राप्त होत नाहीं. सर्व भौतिकशास्त्रांत व धार्मिकशास्त्रांतही प्राविण्य मिळविणें एकाच व्यक्तीला शक्य नाहीं. जी गोष्ट एका व्यक्तीला तीच सर्व राष्ट्रालाही लागू पडते. ज्ञानाच्या अनंत शाखांत सारखेंच प्राविण्य मिळविणें ही गोष्ट एका राष्ट्रालाही शक्य नाहीं. सर्व प्रकारच्या विद्यांत नवे नवे शोध लावून, त्या पूर्णत्वास आणण्याचें कार्य एखादें राष्ट्र अथवा मानवकुलांतील एखादी शाखा करूं म्हणेल, तर तसें करणें शक्य नाहीं असे आढळून येईल. सध्याच्या काळीं युरोपियन राष्ट्रांनीं भौतिकशास्त्रांत अत्यंत प्राविण्य मिळविलें आहे ही गोष्ट खरी; पण जुन्या काळचे युरोपियन लोक धर्मशास्त्राच्या बाब तींत आंधळे राहिले हेंही खरें आहे. त्याचप्रमाणें पौर्वात्य राष्ट्रे भौतिक शास्त्रांच्या बाबतींत अगदीं मागसलेलीं आहेत हें जसें खरें आहे, तसेंच त्यांनी धर्मशास्त्राच्या बाबतींत अत्यंत प्राविण्य मिळविले आहे हेंही खरें आहे.. यामुळेच पौर्वात्यांच्या कित्येक उपपत्ती, पाश्चात्यांच्या भौतिकशास्त्रांच्या उप- पत्तींशीं जुळत नाहींत, एवढेच नव्हे तर पाश्चात्यांच्या सूक्ष्मेंद्रियशास्त्रांच्या सिद्धांतांशींही त्या जुळत नाहींत. पौर्वात्यांचे कित्येक सिद्धांत पाश्चात्य पंडि तांस आक्षेपार्ह वाटतात. याप्रमाणे अनेक प्रकारचे मतभेद दिसत असले तरी प्रत्येकाच्या बुडाशीं सत्य आहे; आणि सत्य म्हटले म्हणजे तें कोण-- त्याही शास्त्रांतील असले तरी वस्तुतः एकरूपच असले पाहिजे, हेही लक्ष्यांत ठेवले पाहिजे. सत्य अनेक प्रकारांनी प्रकट झाले तरी त्यामुळे त्या प्रकारांत विरोध असण्याचें कारण नाहीं. पिंडसृष्टीतील सिद्धांत आणि ब्रह्मांडांतील सिद्धांत हे एकमेकांचे विरोधक नसून पोषक असले पाहिजेत.

ब्रह्मांडावरून पिंड । अथवा पिंडावरून ब्रह्मांड
अर्धीर्ध पाहतां निवाड । कळों येतो ॥ १ ॥