पान:विधवा दुःख निवेदन.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाण्यावरचा बुडबुडा; आतां आहे अंमळशाने नाहीं; परलोकींचा निरोप कोणचे वेळेस येईल ह्याचा कांहीं नेम नाही. ह्मणून आपले मनांत रात्रंदिवस भूतदया ठेवा. परोपकार ह्मणजे पुण्य व परपीडन ह्मणजेच पाप हे तत्व ध्यानांत ठेवा. 'सत्कर्मयोगे वय घालवावें । सर्वांमुखीं मंगल बोलवावें ॥' हे समर्थ श्री रामदास स्वामींचे वाक्य तुमच्या हृत्पटलावर खोदून ठेवा. अहिल्या, द्रौपदी, सीता, दमयंती, सावित्री वगैरे साध्वींची चरित्र नेहमी डोळ्यापुढे ठेवा. त्यांच्यावर केवढाली संकटें आली होती तथापि केवळ ईश्वरावर भरंवसा ठेवून दृढनिश्चयाने त्या सर्व संकटांतून कशा पार पडल्या हे तुझांस माहीत आहेच. त्यांचा कित्ता अक्षय्य डोळ्यापुढे ठेवून तो वळवा; व आपल्या अशिक्षित बहिणींना वळविण्यास लावा. सुखसौभाग्यमंडित ज्या तुमच्या बहिणी मुली असतील त्यांना पति हेच स्त्रियांचे दैवत हे समजावून द्या; गृहिणी ह्या पदास युक्त असें आचरण त्यांजकडून करवा; व त्यांचा संसार सुखासमाधानाने चालेल असे त्यांना वळण लावा. असे करणे हे तुमचे कर्तव्य आहे. हे तुझी केलें ह्मणजे ह्यांत सर्व काही आले. हा मोठाच परोपकार व देहाचे सार्थक्य केल्यासारखे आहे. शेवटी, हे माझ्या लाडक्या भगिनींनो, पुन्हां सांगते, ह्या संकटाच्या स्थितीत सुद्धां, ईश्वराचे भजन पूजन, नामस्मरण करीत कालक्रमणा केली तर, तुमाला सुख प्राप्त होईल ह्मांत संशय नाही.