पान:विद्यार्थि धर्म.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
नववे.]
नाटके, सिनेमा व कादंबऱ्या.

८९


अभ्यङ्गमञ्जनं चाक्ष्णोरुपानच्छत्रधारणम् ।
कामं क्रोधं च लोभं च नर्तनं गीतवादनम् ॥

'नर्तनं गीतवादनं वर्जयेत्' असें हाटलें आहे. नाटकें बहुतेक रात्रींच होत असतात. नाटकाला गेलें कीं जाग्रण ठरलेलें ! श्रृंगारिक भाषा, पात्रांचे हावभाव, या सर्वांचा परिणाम ज्यांच्या अंगांत नुकतें वीर्य उत्पन्न होत आहे, त्यांच्यावर कसा होत असेल; याची स्वानुभवानेंच ज्यांनी त्यांनी कल्पना करावी.

 नाटकाला जाण्याबरोबर त्याच्या अनुषंगाने चहा, सोडावॉटर, विड्या, चिवडा, भजी, यांची मालिका लागते. नाटकाचे वेळी थिएटरच्या भोंवती जी एक परिस्थिति उत्पन्न झालेली असते, ती फारच विचित्र असते. नाटक पहावयास जे प्रेक्षक जातात, त्यापैकीं कांहीं शिष्ट, संभावित व पोक्त सोडून दिले, तर बाकीच्यांचा जो वर्तनक्रम थिएटरांत, बाहेर, बोलण्यांत, पहाण्यांत, हसण्यांत आढळतो; तो पाहिला हाणजे विद्यार्थ्यांनीं नाटकगृहांत जाऊंच नये, असें वाटतें. पदरचे पैसे घालविणे, जाग्रण करणें, साधुवर्य तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे " मोल देउनिया साठवावे दोष । नटाचे ते वेष पाहू- नया " दोष ह्मणजे अनिष्ट गोष्टी ऐकणें, ब्रह्मचर्य -हास होईल असें संस्कारकरून घेणे, इतक्या गोष्टी या नाटकामध्ये आहेत. विद्यार्थ्यांनी ब्रह्मचर्यदशा संपेपर्यंत नाटकें पहाण्याचा मोह आवरलाच पाहिजे. कोणी ह्मणतील कीं एकाद्या सत्कृत्याच्या मदतीसाठीं जर नाटक होत असेल, तर विद्यार्थ्यांनीं कां जाऊं नये; परंतु नाटक न पाहतां सत्कृत्याला मदतकरितां येत नाहीं, असें कशावरून ? नाटकेंच पाहून संस्थेला मदत करणे, ह्मणजे संस्थेबद्दल आपला आदर नसून तो नाटकाबद्दल आहे; असें दाखविण्यासारखे आहे. संस्थेच्या कार्याबद्दल ज्याला सहानुभूति आहे, त्यानें संस्थेच्या कार्यावरच ह्मणजे कार्य पाहून मदत करणें इष्ट आहे. एवढें खरें कीं सामान्य जनसमूहाचे लक्ष एकाद्या कार्याकडे लावण्याकरितां अशा आमिषांची जरूर असते. परंतु त्या आभिपाला विद्यार्थ्यांनी बळी पडूं नये.
१२