पान:विद्यार्थि धर्म.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७२
विद्यार्थि - धर्म.

[ प्रकरण


व्यायामास जावें. विद्यार्थ्यांनी सायंकाळीं तास दोन तास व्यायामाच्या अनेक प्रकारांपैकी जो आवडीचा व्यायाम असेल तो अवश्य केला पाहिजे, सगळ्या संपत्तींत शरीरसंपत्ति ही श्रेष्ठ आहे. मनुष्याच्या सर्व कर्तृत्वाची मदार शरिरावरच असते. शरीर जितके निकोप, निरोगी, सुदृढ व दणकट असेल, त्या मानानें मनुष्याच्या कर्तृत्वास विशेष स्वरूप येतें. " शरीरमाद्यं खलुधर्मसाधनम् " हेंच तत्व खरें आहे. हिंदुस्थानामध्ये दिवसानुदिवस जो शरीरवलाचा म्हास दिसून येत आहे, तो उपेक्षणीय नाहीं. विद्यार्थ्यांना तर यापुढे स्वराज्य मिळवून तें रक्षण करण्याची जबाबदारी पतकरावयाची आहे. या दृष्टीनें त्यांनी शरीरसामर्थ्याकडे विशेष लक्ष्य दिले पाहिजे. मनाला वाचन, पोटाला अन्न, तसाच शरिराला व्यायाम हा अवश्य आहे. व्यायामाच्या अंगीं अनेक गुण आहेत.

लाघव कर्मसामर्थ्य दतोऽग्निर्मेदसः क्षयः ।
विभक्तधनगात्रत्वं व्यायामादुपजायते ॥

[ वाग्भट हलकेपणा, चपळपणा, कोणतेही काम करण्याचे उत्साहयुक्त सामर्थ्य, दीत जठराग्नि, वात झडणे आणि शरीराच्या अवयवांमध्यें घटीव- पणा व कणखरपणा येणें, इतक्या गोष्टी व्यायामानें प्राप्त होतात. व्यायामाचे अनेक प्रकार आहेत, त्यामुळे शरिराला करमणूक होऊन व्यायामहि चांगला होतो. निरनिराळे खेळ, पोहणे, पळणें, नमस्कार, जोर, जोडी, मलखांब, दांडपट्टा, लाठी, बोथाटी, लेजिम, डंबेल्स, करेला व आसने असे व्यायामचे विविध प्रकार आहेत. सोळा वर्षांच्या आंतील विद्यार्थ्यांना खेळण्यासारखा दुसरा उत्तम व्यायाम नाहीं. सायंकाळीं विद्यार्थ्यांनी दीड दोन तास रगडून खेळावें. आट्यापाट्या, खोखो, हुतुतु, सूरपारंबा चेंडूलगुरी, सुरकाठ्या हे देशी खेळ व फुट्बॉल, क्रिकेट, हे विदेशी खेळही विद्यार्थ्यांनी अवश्य खेळावेत. खेळामुळें व्यायामापरी व्यायाम होऊन शिवाय एकेक गुणांचा विकास होतो. आट्यापाट्यांच्या खेळांत हुलकावण्या दाखवून दुसऱ्याला कसें