पान:विद्यार्थि धर्म.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६६
विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण


अत्यंत विसंगत अशा गोष्टी घेऊन मानसिक गुलामगिरीचे प्रदर्शन करूं नये. विद्यार्थ्यांनी आपले कपडे आठ पंधरा दिवसांनीं स्वतः धुवावेत. केव्हां केव्हां परटास द्यावेत. गयाळ, वेडावाकडा पोषाख करण्यांत मोठेपणा मानण्याचे दिवस गेले, ह्मणून व्यवस्थित पोषाख करून विद्यालयास जावें.

 विद्यालयांतील वर्तन- विद्याथ्यांचे विद्यालयांतील वर्तन हल्लींच्या परिस्थितीत कसे असावें हा एक मोठा विकट प्रश्न आहे. सरकारी शिक्षणाचें धोरण, शिक्षणांतील शिस्त आणि अनैसर्गिकता याचा विचार केल्यास विद्यार्थ्यांचे विद्यालयांतील वर्तन स्वाभिमा- नास साजेल असेच पाहिजे. शिक्षणाचे ध्येय विद्यार्थ्यास उत्तम नागरिक बनविणें हें असल्यामुळे शिस्तीच्या नांवाखाली विद्यार्थ्यांवर ज्या . स्वभिमानशून्यतेच्या गोष्टी विनाकारण लादल्या जातील त्या त्यांनी बिल- कुल ऐकण्याचें कारण नाहीं. सरकारी व निमसरकारी मिशनरी शाळांतून विद्यार्थ्यांच्या इच्छेविरुद्ध अनेक गोष्टी घडत असतात. प्रसंगावर नजर देऊन विद्यार्थी त्या सर्व निमुटपणे सहन करितात; परंतु देशांतील जिवंतपणाच्या वातावरणाकडे लक्ष्य देऊन विद्यार्थ्यांनी आपला जिवंत- पणाहि प्रसंगीं दाखविला पाहिजे, शाळेतील गुरुजन जर ते खरें शिक्षक असतील तर ते विद्यार्थ्यांच्या मानी व तेजस्वी स्वभावाचें कौतुकच कर- तील. विद्यार्थी शाळेत विद्यार्जनाकरितांच गेलेले असतात. अर्थात् त्यांची वागणूक ज्ञानजिज्ञासेच्या दृष्टीने योग्य अशीच पाहिजे. शिक्षकांशीं त्यांचें वर्तन प्रेमाचें पाहिजे. याबद्दल मतभेद नाहीं. परंतु सरकारी अधिकान्यांना बरें वाटावें ह्मणून जेव्हां वर्गात एकाद्या देशभक्ताची निंदा एकादा शिक्षक करूं लागतो, किंवा एकादा मिशनरीशिक्षक अंतस्थ दुष्ट हेतूनें आपल्या समाजाची व धर्माची टवाळी करू लागतो, किंवा गांवांत एकादा सरकारला अप्रिय, पण लोकांना अत्यंत प्रिय असा मनुष्य आला असतां एकादा शिक्षक शिस्तीच्यां नांवाखाली त्यावेळीं शाळा मुद्दाम उघडी ठेवून विद्यार्थ्यांना अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करितो, त्यावेळीं विद्यार्थ्यांनी कसे वागावे हाच काय