पान:विद्यार्थि धर्म.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४
विद्यार्थि धर्म.

[ प्रकरण


विषयाचे यथार्थ ज्ञान ह्मणून त्यांना जन्मभरही होत नाहीं. दुसरे कित्येक विद्यार्थी अंकगणितांतली उदाहरणें, भूगोलांतल्या व्याख्या सरसकट घोकून घोकून पाठ करूं लागतात. पाठ करितांना तरी त्यांची चित्तवृत्ति स्थिर असते असेही नाहीं. एकीकडे लक्ष्य, एकी- कडे डोळे, आणि कोणीकडे तरी आपण !! अशा गोंधळांत " नद्या आहेत नद्या आहेत, आहेत आहेत, नामें होत नामें होत, होत होत " असली घोकंपट्टीहि चालते, कांहीं विद्यार्थी सगळाच अभ्यास अगदीं घुम्यानें करितात. त्यांची दांतखिळी जणू बसलेली असते. तात्पर्य अभ्यास कसा करावा हेंच पुष्कळांना समजत नाहीं. अभ्यासाची पद्धति समजून घेऊन अभ्यास केला पाहिजे. गुरुजनांना ती पद्धत विचारली पाहिजे. भाषाविषय चांगला तयार व्हावा ह्मणून मोठ्यानें वाचले पाहिजे. वयाच्या अठरा वर्षांपर्यंत भाषा विषयाचा अभ्यास सामान्यतः मोठ्यानें पण दुसऱ्यास त्रास न होईल अशा तऱ्हेनें करावा पुढे सर्व अभ्यास मननाचा असतो, ह्मणून तो मनाशीं पुट- पुटत करावा. मुकाट्याने वाचनाचा कंटाळा आला कीं मोठ्यानें वाचावें; इकडे तिकडे फिरून वाचावें. गणितासारखा विषय हा आरडाओरड करून कधींहि तयार होत नसतो. विद्यार्थ्यांनीं एकदां सकाळी सात वाजतां अभ्यासाचें ठाण मांडावें तें दहा वाजेपर्यंत हालवू नये. डोकें अगदी ताजेतवानें असलें ह्मणजे पहिल्यानें जो अवघड विषय असेल तोच हातीं घ्यावा. गणितांत डोके चालत नसेल तर आधी उदाहरणे सोडवावीं. विशेषतः उदाहरणे सोडवि- ण्याच्या पद्धति चांगल्या लक्ष्यांत घ्याव्या. विद्यार्थी हें कांहीं न करितां आधी उत्तरे पाहतात आणि कांहीं तरी आंकडेमोडी करून उत्तरें काढण्याचा खटाटोप करीत बसतात. पण हें सर्वस्वी चूक आहे. भाषा व इतिहास हे विषय जर कच्चे असतील तर सकाळी आधी त्यांचें वाचन करावें. भाषेतील शब्द, हाणी, प्रयोग, वाक्प्रचार नवीन क्रियापदें यांचें व इतिहासांतील व्यक्ती, उलाढालींतील मुख्य गोष्टी,महत्वाचे सन यांचेहि टांचण असावें. याविषयांचा थोडक्यांत