पान:विद्यार्थि धर्म.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सहावें. ]
न्याहारी व अभ्यास

५३


होतो; असें हाटल्यावांचून गत्यंतर नाहीं

 अभ्यास कसा करावा - अभ्यास हाणजे कोणतीहि गोष्ट पुनःपुन्हा करून ती अगदी आपलीशी करणे. वाटेल तितकी असाध्य गोष्ट जरी असली तरी ती अभ्यासानें साध्य होते. " असाध्य तें साध्य करितां सायास । कारण अभ्यास तुका ह्मणे" असें तुकाराम महाराज हाणतात. विद्यार्थ्यांचा अभ्यास होत नाहीं त्याचें कारण वर्ग चालला असतां ते दुश्चित्त असतात; आणि प्रसन्न मनाने घरीं एकांतांत या विषयाचें चिंतन करीत नाहींत, हैं होय. " अखंड एकांत सेवावा । अभ्यासचि करीत जावा || " किंवा " एकांतेविण प्राणियातें बुद्धि कैची " अर्से जे श्रीसमर्थ सांगतात त्याचा अर्थ इतकाच कीं, सावधानपणें सुचित अंतःकरणाने अभ्यास करावा. सकाळची वेळ थंड, प्रसन्न व अभ्यासाला शांत अशी असते. अभ्यास याचवेळीं चांगला होतो. सकाळीं तीन साडेतीन तास अभ्यास केल्यास अभ्यासाचे पर्वतचे पर्वत पडतील. वेळी अवेळीं जागरणे करून परीक्षा आली की रात्रीचा दिवस करून, चहाचे कपावर कम उडवून, प्रकृतीवर अनिष्ट परिणाम करून घेऊन, जो अभ्यास करण्याचा प्रसंग येतो तो केवळ दररोज नियमित व व्यवस्थित अभ्यास न केल्यामुळे येतो. वर्गात चांगले लक्ष्य असलें व घरीं नियमित अभ्यास केला ह्मणजे केव्हांही नापास होण्याची भिती नाहीं. वर्गात झालेल्या विषयाचें चिंतन, पुढे होणाऱ्या विषयाचे पूर्वालोकन आणि थोडी मागील उजळणी असा अभ्यासाचा क्रम ठेवावा. नाहीं तर पुढे पाठ मागें सपाट असें होत असतें. पुष्कळ विद्यार्थ्यांना आज अभ्यास काय दिला आहे, याचीच मुळीं वार्ता नसते. मग शेजा- रच्या विद्यार्थ्याकडे जावयाचें, त्यानें कांहीं तरी सांगावयाचें, आणि याने कांहीं तरी ऐकावयाचें, असा खुळेपणा होऊन वर्गात नेहमी छी: थ्रुः होते. कांहीं विद्यार्थ्यांना पाठ करावयाचें काय, लक्ष्यांत ठेवावयाचें काय आणि विचारांत घ्यावयाचें काय याचेंही ज्ञान नसतें. ते बिचारे अंधेरांत चांचपणाऱ्या माणसाप्रमाणे नेहमी संशयांतच असतात.