पान:विद्यार्थि धर्म.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०
विद्यार्थि धर्म.

[ प्रकरण


पिण्याचें पात्र किती उष्टेमाष्ठे असलें, चहामध्ये अस्सल परदेशी साखर असली तरी मिटक्या मारीत मारीत चहा पिण्यांतच त्याला धन्यता वाटते ! विद्यार्थ्यांनी विद्यार्थिदशेत स्वदेशीचे, स्वच्छतेचे आणि शिष्टाचाराचे नियम निग्रहानें पाळले पाहिजेत. विद्यार्थिदशा संप- ल्यावर मग काय वाटेल तें करावें, असें जरी नसलें तथापि ब्रह्मचर्य - दर्शच अगदी कडक नियम ह्मणून कांहीं गोष्टी त्यांनी पाळल्याच पाहिजेत. त्यांतच चहा व त्याची बहीण कॉफी या मादक पदार्थांचे सेवन बिलकुल न करण्याचा त्यांनी निश्चय केला पाहिजे. चहा कॉफीच्या व्यसनाबरोबर दुकानांतील इतर पदार्थ खाण्याची सवय लागते. दुकानांतील पदार्थ हे आरोग्यदृष्ट्या, खर्चदृष्ट्या, व ब्रह्मचर्य - दृष्ट्या हानिकारक असतात. मसालेदार चिवडा, मिसळ, कांद्यांची भजीं, उसळी हे उद्दीपक पदार्थ पुष्कळ खाणे, नेहमी खाणें व ते दुकानांतील खाणें ह्मणजे मृत्यूला लवकर आमंत्रण देणें होय.

 अभ्यासाची जागा- प्रातराशाच्या संबंधानें वर जो विचार केला तो लक्ष्यांत ठेवून विद्यार्थ्यांनीं कांहीं न्याहारी करावी व अभ्यासाच्या खोलींत जाऊन अभ्यास करण्यास लागावें. अभ्यासाची जागा प्रत्येकाला अगदी स्वतंत्र असते असे नाहीं, तथापि माध्यमिक शिक्षण घेणारे विद्यार्थी घरांत किंवा इतरत्र थोडे पृथकपृथकपणेच अभ्यास करीत असतात. इतर सर्व व्यवहार होणाऱ्या जागेपेक्षां थोडी निराळी जागा अभ्या- साला पाहिजे, सामान्यतः हल्ली जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणींच हायस्कुले झाली असून तेथील वस्ती थोडी थोडी शहरासारखीच होऊ लागली आहे. अर्थात् बरेच मध्यम स्थितीतील विद्यार्थी स्वतंत्र खोल्या मधूनच अभ्यास करितांना दिसतात. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची खोली किंवा जी जागा असेल ती कशी असावी याचाहि थोडा विचार केला पाहिजे. हिंदुस्थानांतले हे विद्यार्थी भावी नागरिक व्हावयाचे आहेत, त्यांच्या सर्व गोष्टी कित्ता घेण्यासारख्या पाहिजेत.