पान:विद्यार्थि धर्म.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पांचवें. ]
स्नान, संध्या व नमस्कार.

४१


करितात. विद्वानाकडे विद्येची, धनवंताकडे धनाची, धन्वंतऱ्याकडे औषधाची याचना केल्यास ती जर फलद्रूप होते, तर सूर्याकडे केलेली तेजाची याचना विफल होईल, अशी शंकासुद्धां विद्यार्थ्यांनी मनांत आणूं नये. श्रीसूर्यनारायणाच्या उपासनेने विद्यार्थ्यांचे चित्तै- काय वाढेल. चलचित्तता ह्मणजे दुश्चितपणा हा एक विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या मार्गांत मोठा अडथळा आहे. तो नाहींसा होण्यास कांहीं काळ उपास्य देवतेच्या चिंतनामध्ये घालविणे हाच मुख्य उपाय आहे. कांहीं कालपर्यंत एकाच विषयाचे चिंतन करण्याची मनाला सवय लाविली पाहिजे. या सवयीशिवाय कुशाग्रता हा गुण येत नाहीं. द्रोणाचार्यांनी एकदां सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली त्यावेळी फक्त अर्जुनानेच " नेम मारण्याच्या जागेशिवाय कांहीं दिसत नाहीं. " असें उत्तर दिले, ही गोष्ट प्रसिद्धच आहे. संध्येमध्ये प्राणायाम, आसन इत्यादि अंगें चित्ताच्या एकाग्रतेकरितांच सांगि- तलेलीं आहेत. मंदबुद्धि विद्यार्थ्यांनीं बुद्धिमान् होण्याकरितां व बुद्धिमानांनी प्रतिभावान् होण्याकरितां सूर्योपासना नित्य करावी. ऋषींनी दीर्घसंध्या केली ह्मणून ते दीर्घायुषी झाले असे जे मनुस्मृतींत झटलें आहे त्याचा अर्थ दीर्घकाळ सूर्योपासना आणि दीर्घकाळ चित्तैकाग्रथ असाच आहे. * न चुकतां नियमित बारा वर्षे विद्यार्थ्यांनी संध्या व सूर्योपासना आस्तिक्य बुद्धीनें केल्यास त्याचें फळ त्यांना मिळाल्यावांचून कधींहि राहणार नाहीं.

 सूर्यनमस्कार - श्रीसूर्यनारायणाची उपासना करण्याचा दुसरा एक प्रकार हाणजे सूर्यनमस्कार हा होय. पहिली उपासना जशी मानसिक आहे तशी ही दुसरी उपासना शारिरिक आहे. उपासनेने शरीर कष्टवून शरीर- बल वाढविण्याचा आणि स्वार्थमार्थ साधण्याचा नमस्कार हा


  • टीप - ऋषयो दीर्घसध्यत्वात् दीर्घमायुरवाप्नुयुः - ॥ मनु ॥