पान:विद्यार्थि धर्म.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पांचवें. ]
स्नान, संध्या व नमस्कार.

३७


असेल त्यांनी नेत्रस्नान नेहमी करावें. नेत्रस्नान हें शीतोदक स्नाना- बरोबर सहजासहजी होणारे असून नेत्ररोग नाहींसें करणारे आहे. नेत्रस्नानानें तालूवरहि परिणाम होतो व डोके दुखणें नाहींसे होतें.

 स्नान उघड्या हवेंत करूं नये. स्नानानंतर अंगास वारा लागूं नये वगैरे ज्या गोष्टी हल्लीचे डॉक्टर सांगत असतात त्या फक्त आजाऱ्यांना उद्देशून असतात असें समजावें. हिंदुस्थानच्या हवामानाला बिनवायचीं स्नानगृहें असण्याची मुळींच आवश्यकता नाहीं. प्रातः स्नानाच्या वेळीं बराच वेळ अंग न पुसतां गारठत बसणें, किंवा न पोहतां पाण्यांत उगीच डुंबत बसणे, किंवा गार वारा सुटला असतांना चेंगटपणानें धोत्रे धूत, भांडी घांसत बसणें, या गोष्टी मात्र शरीरास अपायकारक आहेत. ह्मणून या टाळून स्नान करून स्वच्छ अंग पुसून विद्यार्थ्यांनी गंगाष्टक, कृष्णाष्टक, अशी स्तोत्रें ह्मणावीं. स्नानाच्या वेळीं दररोज शिकेकाई, साबण, हे पदार्थ वापरण्याची जरूरी नाहीं. मात्र अभ्यंग स्नानाच्या वेळी या पदार्थांचा ( ते देशी असल्यास ) उपयोग करण्यास हरकत नाहीं. पुष्कळ विद्यार्थ्यांना विद्यार्थिदशेचें विस्मरण पडून त्यांना या वयांत अनेक प्रकारचे ढंग सुचूं लागलेले आहेत असें दिसते; परंतु ब्रह्मचर्य स्थितीमध्ये "नित्यं खात्वा शुचिः कुर्यात् " ह्मणजे नित्य स्नान करून शरीर स्वच्छ करणे एवढाच वास्तविक उद्देश असला पाहिजे; पुष्कळ विद्यार्थ्यांचे आयुष्य विशेषतः सकाळचा वेळ हा बायकांप्रमाणें नतापटा करण्यांत व्यर्थ जात असतो. सकाळीं सात आठ वाजेपर्यंत प्रातर्विधि, नंतर स्वहस्तें दाढी अगर सबंद स्मश्रु, नंतर तेल, साबण हीं घेऊन स्नान, पुढे केशांची मशागत, भांग काढणे, आर- शांत पाहून कुंकवाप्रमाणें टिकली चढविणे इत्यादि गोष्टी करण्यांत पुष्कळ विद्यार्थी आपला सकाळचा बहुमोल वेळ दवडीत असतात. दररोज तेल लावणें, ऊन पाण्याने स्नान करणे, सुंगधी अत्तरें, लव्हेंडरे वापरणें, अशा गोष्टी विद्यार्थ्यांनीं सर्वस्वी वर्ज्य केल्या पाहिजेत. 'गंधं वर्जयेत्, माल्यं वर्जयेत्, रसान् वर्जयेत्, अभ्यंगं वर्जयेत्, अंजनं वर्जयेत्'