पान:विद्यार्थि धर्म.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२
विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण


आजूबाजूस थोडी राहिली तरी कुजण्याचे मुळींच भय नसतें. बाभळीची अंतरसाल कुटून त्यांत थोडा कात व तुरटीची लाही घालून वस्त्रगाळ पूड बनविली तर तीहि फार चांगली. ही देशी टूथपाऊडर विद्यार्थ्यांनी वापरावी. चहापान, जाग्रणें आणि इतर उष्णतावर्धक कारणे यांमुळे पुष्कळ विद्यार्थ्याच्या दांतांतून तारुण्यांतच रक्त पडूं लागतें. अशा वेळीं वरील प्रकार विद्यार्थ्यांनीं जरूर अमलांत आणावेत. बकुळीला तर वज्रदंती असे हाटले आहे. वज्रासारखे दांत बळकट व्हावे अशी इच्छा असल्यास बकुळीच्या सालीच्या पाण्याचे गुळणे नेहमी करावेत. रस्त्यावरील कुंपणाच्या कडेस मोगली एरंड बहुतेक ठिकाणीं परमेश्वरानें निर्माण केलेले असतात. याच्या चिकानें दांत बळकट होत असतात, दांत हालतात किंवा रक्त येते तेव्हां या मोगली एरंडाचा चीक दांतांवर अवश्य घालावा. दांत बळकट असले हाणजे अन्नाचें चांगलें चर्वण होते आणि चांगल्या चर्वण झालेल्या अन्नाचा विपाकही चांगला होऊन आयुष्य वाढतें. दंतधावन हा विषय या दृष्टीने फारच महत्वाचा आहे. लहानपणीं हलगर्जीपणा केल्यास त्याचे दुष्परिणाम पुढे कसे कसे भवतात व आयुष्याचे कसे मातेरें होतें, हें समजावें ह्मणून मुद्दाम विस्तार केला आहे. दांत चांगले घांसून जीभहि चांगली घांसावी. नाक, डोळे, कपाळ, कान व हातपाय स्वच्छ धुवावेत आणि आपल्या जागेचा केर काढावा. केर काढतांना वळकटी, दिवा, पुस्तकें, कपडे हे पदार्थ उचलून बाजूस ठेवावेत. कपडे चांगले झडझडून झाडावेत. सांदी, कोपरे, कोनाडे व भिंती यांच्यावरहि केरसुणी फिरवावी व अगदीं निर्मळ केर काढावा, केर काढतांना कुणाच्या अंगावर जात असेल तर दार लावावें, बाजूस व्हा असें ह्मणावें.कोपऱ्यांत केर सांठवून न ठेवितां लगेच तो भरावा व टाकावा.


______________