पान:विद्यार्थि धर्म.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०
विद्यार्थी - धर्म .

[ प्रकरण


पाठांतर पाहिजे असें ते ह्मणत. लोकमान्य टिळकांचीहि स्मरणशक्ति किती दांडगी होती हैं गीता - रहस्यावरून समजतें. पुस्तक वाचून टांचणे करणें किंवा पुस्तकांतच खुणा करणें ह्मणजे एक प्रकारचे परावलंबन होय. खुणा करून ठेवलेले पुस्तक कोणी उप- टलें, किंवा हरवलें तर ज्ञानाची नुसती हळहळ वाटेल. नेहमी पुस्तकाकडे दृष्टी लावल्यामुळे ज्यांच्यावर डोळे बिघडण्याचा प्रसंग आला आहे, त्यांनी खूप पाठांतर करून त्याचा विचार करण्यास शिकावें. सुमारें तीन चार तास सारखे ह्मणत राहिले तरी पुरेल, इतके विविध पाठांतर विद्यार्थ्यांजवळ असावें. विचार आत्मसात् करण्यास पाठांतरच पाहिजे. तात्पर्य, विद्यार्थ्यांनीं राष्ट्रोद्धारार्थ, ईशकृपा- संपादनार्थ आणि आयुष्यवर्धनार्थ पंचपंच उषःकाळी उठून ह्मणजे ऋतुमानाप्रमाणें पहाटे पांच ते साडेपाचपर्यंत उठून - अवश्य अवश्य ईशस्तवन करावें व वाणी- शुध्यर्थ, स्मरणशक्तिसंवर्धनार्थ दररोज पहाटे न चुकतां कांहीं तरी पाठ करावें.

___________
शौच व मुखमार्जन.

 श्री समर्थ ह्मणतात दिशेकडे दूरी जावें । शुचिष्मंत होवोनि यावें " किंवा ' शौचाचमन करावें । निर्मळ जळें ।' ह्मणजे प्रातःस्मरण व पाठांतर थोडें झाल्यावर शौचाची प्रेरणा होतांच तो विधी उरकावा. एकाद्या विद्यार्थ्याला उठल्याबरोबर शौचास जावें असे वाटल्यास त्यानें जाऊं नये, असे मात्र नव्हे. पुष्कळ विद्यार्थ्यांना जसे नीट जेवता येत नाहीं, तसें शौचासही नीट बसतां येत नाहीं. वर मळ न पडेल अशा रीतीनें दार लावून जपून शौचास बसावें. शहरच्या वस्तीमध्ये शौचास बाहेर जाणें शक्य नसतें; परंतु खेड्यांत शक्य असतें. " बहिर्दिशा " हें अन्वर्थक नांव आहे. शौचास दूर जाऊन रिक्त हस्ताने न येतां परत येतांना कांहीं तरी घरी आण- ण्याची चाल अद्यापिहि खेड्यांतील वृद्धांच्या ठिकाणी आढळते.