पान:विद्यार्थि धर्म.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८
विद्यार्थि - धर्म.

[ प्रकरण


विद्यार्थ्यांना देशोद्वारार्थ सकाळीं ईशचिंतनाची अपेक्षा आहे. भूपाळ्या, करुणाष्टकें, भारतसावित्रीतील कांहीं श्लोक ह्मणण्याची पद्धत अद्याप जुन्या घरंदाज घराण्यांमध्ये दररोज दिसते. विद्यार्थ्यांनी दररोज प्रातःस्मरण करावें समर्थांच्या जिवंत वाणींतून बाहेर पडलेले मनाचे श्लोक निदान त्यांतील ' प्रभाते मनी राम चिंतीत जावा ' ' जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा नुपेक्षी कदा रामदासाभिमानी' हे तीन श्लोक कोणत्याही विद्यार्थ्यांनी हाणण्यासारखे आहेत. विद्यार्थ्यांनी प्रातःस्मरणानंतर “हे परमेश्वरा मी तुला शरण आलो आहे. माझ्यावर कृपा कर आणि मला देशकार्य करण्यास सामर्थ्य दे " एवढी करुणा भाकावी. येवढे प्रातःस्मरण करीत गेल्यास आणि आपल्या देशाचे स्मरण ठेवल्यास ईश्वरनिष्ठा आणि देशाभिमान हे सगुण अंगीं उत्पन्न होण्यास साहाय झाल्यावांचून रहाणार नाहीं.

 पाठांतर :- श्रीसमर्थ सांगतात " प्रातःकाळी उठावें । कांहीं पाठांतर करावे । यथानुशक्ती. आठवावें । सर्वोत्तमासी " (द० ११ स ० ३ ). समर्थांच्या हाणण्याप्रमाणें विद्यार्थ्यांनीं यथाशक्ती ईश- स्मरण केल्यावर थोडाबहुत अभ्यास करावा. अर्थात् तो अभ्यास कांहीं तरी पाठ करण्याचा असावा. पहाटेच्या वेळी विद्यार्थ्यांनीं कांहीं तरी जिवंत पद्यवाङ्मय - जें आपल्या जन्माचें सोबती होईल असेच पाठ करावें. पहाटेची वेळ ही पाठ करण्याला फारच उत्तम असते. ज्यांची वाणी बोजड असेल ( पुष्कळ विद्यार्थ्यांची जीभ जड असते ) त्यांनीं नित्य पहाटे उठून गीता, उपनिषदें, पुरुषसूक्त, हिरण्यसूक्त, नासदीय सूक्त, राष्ट्रसूक्त असले वेदांतील वेंचे, केकावली, मनाचे श्लोक, कांहीं भक्तिरसाने भरलेलीं प्रासादिक स्तोत्रें, उत्कृष्ट कविता अशा तऱ्हेचें वाङ्मय पाठ करावें. अपार पाठांतर असले ह्मणजे स्मरणशक्ति तीव्र रहाते आणि समयसूचकता


  • टीप - पुस्तकाच्या शेवटीं प्रातःस्मरण दिले आहे.