पान:विद्यार्थि धर्म.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चौथें. ]
नित्यक्रमांतील कांहीं गोष्टी.

२७


प्रकारची मदतच होत असते. सामान्य व्यवहार असा आहे कीं, ज्या गोष्टी नित्याच्या असतात त्यांची किंमत फार थोडी वाटते व ज्या नैमित्तिक असतात त्यांचे महत्व फार वाटते; परंतु विद्यार्थ्यांनीं नैमित्तिक गोष्टीचेच महत्व नित्य गोष्टींना द्यावें आणि आपला नित्य- क्रमच असा ठेवावा कीं त्यायोगे साध्यानुकूल साधनें हस्तगत होतील. विद्यार्थ्यांच्या नित्यक्रमांतील कांहीं गोष्टींचा विचार या प्रकरणांत करावयाचा आहे.

 १ प्रातरुत्थान व प्रातःस्मरण – विद्यार्थ्यांनीं नेहमी सूर्योदयापूर्वी एक तासभर तरी उठलेच पाहिजे. ब्राह्ममुहूर्ती ह्मणजे प्रभातकाळी कोणीही निजूं नये, असें धर्मशास्त्र सांगतें व तें आरोग्य- शास्त्राला संमत आहे. लवकर उठलें ह्मणजे आळस पळतो, हुशारी येते व सर्व कामे वेळचे वेळीं होतात. 'लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान संपत्ति आरोग्य भेटे' ही अर्थपूर्ण लौकिक हाणही पहाटे लवकर उठण्याचे महत्व दाखविते. प्रभातकाल, अरुणोदय, तांबडें फुटण्याची वेळ ही सर्व वेळांमध्ये, अत्यंत सात्विक वेळ असते. सर्व जग सुषुप्तिसुखाचा अनुभव घेऊन जगांतील उलाढाली करण्यास ताजे- तवाने झालेले असतें. मनुष्य प्राण्याच्या हातून अनेक चुका असतात. त्या सर्व चुकांचे किंवा अपराधांचे परिमार्जन विस्मरणामुळे सुषुप्तीमध्येच होते. सुषुप्तीतून जागृतावस्थेत आलेला ताजातवाना मनुष्य कधीहि खिन्न असत नाहीं, पक्ष्यांनाही या वेळीं आनंद वाटतो व ते मधुर गायन करूं लागतात. पशूंनाही उल्हास वाटतो. दुभतीं जनाबरें पान्हावूं लागतात. अर्थात् अशा प्रकारच्या अत्यंत उत्साहाच्या आणि प्रसन्नतेच्या वेळीं विद्यार्थ्यांनीं झोप घेणें योग्य आहे काय ? लवकर उठणे हैं एक दीर्घायुष्याचे साधन आहे, ह्मणून विद्यार्थ्यांनीं ब्राह्मे मुहुर्तेचोत्थाय । चिंतयेदात्मनो हितम् ॥ ह्मणजे पहाटे उठून आपल्या हिताचे चिंतन करावें, पहाटेच्या नितांत प्रसन्न, शांत व सात्विक वेळीं विद्यार्थ्यांनीं उठल्याबरोबर लघुशंका करून चूळ भरून आधीं ईशचिंतन करावे. सर्व हिंदू