पान:विद्यार्थि धर्म.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिशिष्ट दुसरें.
हा हिंददेश माझा.
गजल.

आनंदकंद ऐसा, हा हिंददेश माझा ॥ ध्रु० ॥
सत्यासि ठाव देई, वृत्तीस ठेवि न्यायी ।
सत्त्वास मानि राजा, हा हिंददेश माझा ॥ १]
जगदीश जन्म घेई, पदवीस थोर नेई,
चढवी स्वधर्मसाजा, हा हिंददेश माझा ॥ २ ॥
जनकादि राजयोगी, शुक, वामदेव त्यागी,
घुमवीति कीर्तिबाजा, हा हिंददेश माझा ॥ ३ ॥
दमयंति, जानकी ती, शीलास भूषवीती,
नटली नटेशगिरिजा, हा हिंददेश माझा ॥ ४ ॥
विश्वास मोह घाली, ऐसी मुकुंदमुरली,
रमवी जिथें निकुंजा, हा हिंददेश माझा ॥ ५ ॥
गंगा हिमाचलाची, वसती जिथे सदाची,
होऊनि राहि कलिजा, हा हिंददेश माझा ॥ ६ ॥
पृथुराज, सिंह, शिवजी, स्वातंत्र्यवीर गाजी,
करिती रणांत मौजा, हा हिंददेश माझा ॥ ७ ॥
तिलकादि जीव देही, प्रसवूनि धन्य होई,
मरती स्वलोककाजा, हा हिंददेश माझा ॥ ८ ॥
जागं त्या बिना कुणीही, स्मरणीय अन्य नाहीं,
थोरांत थोर समजा, हा हिंददेश माझा ॥ ९ ॥