पान:विद्यार्थि धर्म.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सोळावें. ]
तरुण पिढी व खेडीपाडी.

१५३


येतील, अशी प्रशस्त व हवाशीर जागा तालमीची असावी. येथे कुस्ती, मलखांब, जोर, जोडी, लेजीम, दांडपट्टा, लाठीकाठी, बोथाटी, झोपाळा अशी व्यायामाची साधनें असावीत. तालीमखान्याला जोडून खेळण्याकरितां एक पटांगण करितां आल्यास उत्तम. ह्मणजे आपली मुलेबाळे कायकाय खेळ खेळतात हे पहाण्यास गांवांतील सर्व तऱ्हेची सर्व दर्जाची मंडळी येतील. गांवच्या सोईप्रमाणे वर्षातून एकदां तालमीचा वार्षिकोत्सव करावा. त्यावेळीं मर्दानी शर्यती व पारितोषिके यांची व्यवस्था करावी. एका खेड्यांत हें काम व्यव- स्थित होऊं लागलें की आसपासच्या लोकांनाहि आपआपल्या गांवीं तसे करावेसे वाटेल. राष्ट्राचा मर्दानीपणा वाढविण्यास ही स्पर्धा उपयोगी पडेल. सुशिक्षितांना अशिक्षितांत मिसळण्याचा फायदा मिळेल आणि अशिक्षितांशी अधिक परिचय झाल्यामुळे त्यांतील हि माणसं सार्वजनिक कार्यात सामील होतील.
 उत्सव व जत्रा - मनुष्य प्राणी उत्सवप्रिय आहे. हाणून प्रत्येक खेड्यात सर्व लोकांना सामील होण्यासारखा एकादा उत्सव पाहिजे. सामान्यतः उत्सवामध्यें जरा वरचे लोक येतात. व जत्रेमध्ये सामान्य जनतेचाच भरणा असतो. प्रत्येक खेड्यांत एकेक तरी सार्वजनिक उत्सव असावा. त्या प्रसंगानें परगांवाची चार शिष्ट मंडळी आपल्या गांवीं येतील. गांवामध्ये नेहमीं, तट असतात, व ते सार्वजनिक कार्याचा विघात करितात. अशा वेळीं परक्या पाहुण्यांनी येऊन चारदोन गोष्टी अधिक सांगितल्या तर गांवां- तील तीव्र विकोपावर बरेचसे विरजण पडतें. खेड्यापाड्यांत काम करणाऱ्यांनी आपले वर्तन अगदीं त्रयस्थपणाचें व निःपक्षपातीपणाचें ठेवावे. ह्मणजे त्यांना एकविचार, एकध्येय, एकस्फूर्ति यांचे शिक्षण लोकांना देतां येईल. ' एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ ' असें प्रत्यक्ष वर्तन होऊं लागण्यास उत्सवासारखे नैमित्तिक प्रसंग चांगले असतात. उत्सवांत व्याख्यान, पुराण, प्रवचन अशा कार्यक्रमा- कडे विशेष लक्ष द्यावे. उत्सवांतील आरासही सुबक, साधी व