पान:विद्यार्थि धर्म.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४४
विद्यार्थि - धर्म.

[ प्रकरण


शास्त्रीय चर्चा होईल. व्यापाराच्या व्यवहारांत चांगली माणसे पडूं लागलीं ह्मणजे परकीय व्यापाऱ्यांशी टक्कर देतां येईल. व्यापारी स्वराज्य हातीं आल्याविना स्वप्नांतही देशोद्वार होणार नाहीं. राष्ट्रांत व्यापारी डोके निर्माण झाले ह्मणजे गांवांत कच्चा माल कोणता आहे, त्याचा पक्का माल कसा तयार करावा असे सर्व विचार घोळू लागतील. हिरडा, निवडुंग, करंज, बाहवा अशा व्यर्थ जात असलेल्या पदार्थांचा उपयोग कसा करून घ्यावा, हे समजूं लागेल. कांहीं नाहीं तरी दोन हजार वस्तीच्या गांवांत चारणांच सुशिक्षित तरुण व्यापार करून चांगला योगक्षेम चालवितील. नोकरीपेक्षां कोणताहि स्वतंत्र धंदा चांगला. पंचवीस रुपये मिळविणाऱ्या कारकुनापेक्षां हिंगजिरें विकणारा व त्यावर पोट भरणारा वाणी मोठा, हैं तत्त्व आमच्या सुशिक्षितांना पटले पाहिजे. अशिक्षित अडाणी लोकांच्या हाती व्यापार कितीहि युगें असला तरी त्याला शास्त्रीय स्वरूप येणार नाहीं. राष्ट्राचा प्राण जो व्यापार त्याला शास्त्रीय स्वरूप आल्यावांचून राष्ट्रहिं जगणार नाहीं. हाणून सुशिक्षितांनी खेड्यापाड्यांत राहून व्यापारास सुरवात केली पाहिजे.
 पांचचार सुशिक्षित व्यापारी खेड्यांत राहूं लागले ह्मणजे गांवांतील कुटाळांवर एकतऱ्हेचे वजन पडेल. पुष्कळ खेडीं अशीं आहेत की तेथे वजनदार व सभ्य मनुष्य नसल्यामुळे ती अगदी गांवढळ होत आहेत. सुशिक्षित तरुणांना गांवांत स्वदेशी वस्तूंचे एकादें दुकान चालवितां येईल. कापड, साखर, कांच, लेखनोपकरणे, हे स्वदेशी जिन्नस गांवांत मिळण्याची सोय होईल. स्वदेशीचे प्रेम वाढण्याला स्वदेशी माल डोळ्यांपुढे असावा लागतो. असो. हिंदुस्थानचें राज्य कंपनीसरकारने आधीं घेतले; स्वराज्य मिळवावयाचे असेल तर खेड्यांतूनहि व्यापारी कंपन्या दिसल्या पाहिजेत. हल्लीं संघाशिवाय कार्याला महत्त्व येत नाहीं. असे व्यापारी संघ जर सुशिक्षित लोक व्यापारी झाले तरच निर्माण होतील.