पान:विद्यार्थि धर्म.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सोळावे. ]
तरुण पिढी व खेडीपाडी.

१३९


मिळणार नाहीं. व मिळाले तरी चालणार नाहीं, शेतकऱ्याच्या झोंपडींतील ध्वनीचा प्रतिध्वनि राष्ट्रीयसभेत निघू लागला पाहिजे. शेतकऱ्याची मनोभावना राष्ट्रीय भावनेशीं समरस झाली कीं हां हां ह्मणतां देशांत सुधारणा होईल.
 हिंदी राष्ट्राचे घटक जे खेडें तें नमुनेदार व्हावे ह्मणून पुढारी लोक हल्लीं तरुणांना खेड्यांत जाण्यास सांगत आहेत. खेडीं सुधा- रलीं कीं देश सुधारला. खेड्यापाड्यांची सुधारणा झाली कीं हिंदुस्थान देशाची सुधारणा झाली, असाच खरा अर्थ आहे. या कार्याचे महत्त्व सुशिक्षितांना अद्याप पटावें तसें पटलें नाहीं. शहरांत राहून लेखनबाजी व वक्तृत्वबाजी करण्यांतच ते दंग झाले आहेत. खेड्याच्या अन्नावर वाढलेल्या व खेड्याच्या पैशावर ज्ञानसंपन्न झालेल्या सुशिक्षिताला खेड्यांत रहावें असे वाटत नाहीं. खेड्यांतील गोताशीं, वातावरणाशीं, सुशिक्षिताचे जमत नाहीं. त्याच्या गरजा, त्याच्या सवयी आणि त्याची कल्पनासृष्टि अगदी निराळी असल्यामुळे त्याला नोकरीकरितां शहराची वाट धरावी लागते. सुशिक्षित हा शहरांत गेला कीं पोट भरण्यापलीकडे त्याच्या बुद्धीचा विशेष उपयोग होत नाहीं. उलट मोठ्या झाडाच्या सावटांत वाढलेल्या झाडाप्रमाणे त्याच्या बुद्धीची कुचंबणा होते. अशी कुचंबणा होणें हा राष्ट्रिय घात आहे. याचे पर्यवसान ईर्ष्या, मत्सर, व शत्रुत्व यांत होतें. खेड्यांत राहण्याची वृत्ति, खेड्यांत भागतील अशा गरजा, शुद्ध रहाणी, प्रेमळ स्वभाव, आणि आत्मविश्वास यांचा अवलंब करून सुशिक्षित तरुणांनी यापुढें खेड्यांत राहून काम करण्यास प्रारंभ केला पाहिजे. खेड्यांत राहून आपल्या आचारविचारांचें लोकांवर वजन ठेवून तेथील जनतेला सुबुद्ध व सुसंस्कृत करण्याचे कार्य तरुणांनी केले तरच तरणोपाय आहे.
 शहरांत राहून सुशिक्षितांना जी कमाई करितां येते ती खेड्यांतहि करितां येईल. कृषि, व्यापार, वैद्यक, धर्मोपदेशक व