पान:विद्यार्थि धर्म.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पंधरावें. ]
देशकार्येच्छु तरुणांस कांहीं सूचना.

१३७


करितो तोच खरा स्वार्थत्यागी होय. सार्वजनिक कार्यात भिन्न भिन्न प्रकृतींचीं व भिन्न भिन्न स्वभावांचीं माणसें एकत्र होत असतात. अशा वेळीं राष्ट्रहितार्थ स्वमत बाजूस ठेवून काम करणें हेंच खरें शहाणपणाचे व स्वार्थत्यागाचे द्योतक आहे. राष्ट्रांतील तरुणांत शुद्ध सात्विक त्यागाच्या कल्पना आल्या ह्मणजेच राष्ट्रोद्धार होतो.
 पुष्कळ तरुणांना हल्ली अविवाहित राहून देशकार्य करावें असें वाटतें. समर्थांच्या राजकारणांत ब्रह्मचारी व घरभरी असे काम करणाऱ्यांचे दोन वर्ग होते, हल्लींच्या या दारिद्यामुळे पुन्हां तसे वर्ग पडणार असें दिसत आहे. अविवाहित, एकेकटे असे काम करणारे तरुण राष्ट्राला मिळाले तर पाहिजेतच. पण अविवाहित राहूनच देशकार्य करितां येते असे मात्र नाहीं. पुरुषाप्रमाणे स्त्रियाहि देश- कार्यप्रवण झाल्या पाहिजेत. त्याला गृहस्थाश्रम हीच संस्था योग्य आहे. अविवाहिताच्या मागें प्रपंचाची काळजी नसते व त्यामुळे काम करण्याला स्वस्थता मिळतें असें जरी असले तथापि गृहस्था- श्रमाची जेमतेम तोंडमिळवणी करितां आल्यावर मग गृहस्थाश्रमी माणसाला देशकार्य करण्याला कोणतीच अडचण नाहीं. देशकार्यांत पडणाऱ्या अविवाहित माणसांनीं सुदृढ शरीर, नीतिमत्ता, ईश्वरनिष्ठा व विद्वत्ता ही संपादन केलीच पाहिजेत, अविवाहित व एकाकी माणसाने आजारी न पडणे हे पहिले स्वतःचें देशकार्य समजले पाहिजे, सुदृढ शरीरांवाचून आरोग्य रहात नाहीं. व अशा मनुष्याच्या मार्गे आजार लागला ह्मणजे त्याचे हाल कुत्रा खात नाहीं. गृह- स्थाश्रमी मनुष्याचें मन हैं निरनिराळ्या ठिकाणी रंगून जाते. पण ब्रहाचारी अविवाहित माणसाच्या मनाला कार्यानंद, विद्यानंद आणि ईश्वरनिष्ठा हेच विषय पाहिजेत. कार्यात अपयश येऊं लागलें तर विद्यानंदांत तल्लीन व्हावें. कार्याला खंड पडला तर ईश्वरभजनांत दंग व्हावे. पुनश्च कांहीं कालानें कार्य सुरू करावें. अशा कार्य- क्रमांत एकाकी माणसाने राहिले पाहिजे.
 १८